‘वंदे भारत मेट्रो’ लवकरच सुरू; कोणत्या राज्याला मिळणार पहिला मान? तिकिटाचे नेमके दर काय? बघा संपूर्ण बातमी!

वंदे भारत ट्रेनच्या अनेक सेवा देशभरात सुरू आहेत. त्यात नवनवीन सेवांची भर पडत आहे. वंदे भारत ट्रेनच्या यशस्वीतेनंतर वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर व्हर्जनच्या प्रोटोटाइप मॉडेलचे रेल्वेमंत्र्यांनी अनावरण केले. अवघ्या काही महिन्यात पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यातच आता वंदे भारत मेट्रो लवकरच सुरू केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, वंदे भारत मेट्रो ट्रेनच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन देशाच्या सेवेत येण्यास सज्ज झाली असून याचा पहिला मान गुजरातला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पहिल्या वंदे भारत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पहिला मान गुजरातला! ‘या’ मार्गावर सेवा होणार सुरू..

पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरु होणार असून याबाबतचे रेल्वे मंत्रालयाने वेळापत्रक देखील जारी केले आहे. पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन भुज ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. ही रेल्वे आठवड्यातून ६ दिवस चालवली जाणार आहे. १६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या पहिल्या वंदे भारत मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भुज ते अहमदाबाद पहिली वंदे भारत मेट्रो अंजार, गांधीधाम, भचाऊ, समखियाली, हलवद, , विरमगाम, चांदलोडिया आणि साबरमतीला या स्थानकांवर थांबेल. तर अहमदाबादहून निघालेली ध्रांगध्रा पहिली वंदे भारत मेट्रो साबरमती, चांदलोडिया, विरमगाम, ध्रांगध्रा, हलवद, समखियाली, भचाऊ, गांधीधाम अंजार मार्गे भुजला पोहोचेल.

पहिल्या वंदे भारत मेट्रोचे तिकीट दर किती असतील?

पहिल्या वंदे भारत मेट्रो तिकिटाचा कमीत कमी दर ३० रुपये असेल. ५० किलोमीटरच्या प्रवासाला ६० रुपये इतके शुल्क लागेल. वंदे भारत मेट्रो ट्रेनमध्ये मासिक पास वैध असेल. साधारण मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनसाठी जारी केलेले तिकीट चालणार नाही. यासाठी वेगळे एमएसटी (MST) तिकीट जारी केले जाईल. तसेच, यामध्ये साप्ताहिक, मासिक तिकीट उपलब्ध असेल. प्रवाशांना सात दिवस, १५ दिवस, २० दिवसांच्या एकेरी प्रवासाचे शुल्क भरावे लागेल.

पहिल्या वंदे भारत मेट्रोची वैशिष्ट्ये काय असतील?

वंदे मेट्रो ट्रेन ही वंदे भारत ट्रेनसारखीच असेल, परंतु उपनगरीय मेट्रो प्रणालीची वैशिष्ट्ये आणि सोयी सुविधा या ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत. या ट्रेनमध्ये दोन्ही बाजूला इंजिन तसेच स्वयंचलित दरवाजे असतील. पहिली वंदे भारत मेट्रो १० डब्यांची असणार आहे. वंदे भारत आणि वंदे मेट्रोमधील मुख्य फरक हा आहे की, ही ट्रेन पूर्णपणे अनारक्षित असेल. प्रवासी ही ट्रेन सुटण्याच्या वेळेपूर्वी काउंटरवर तिकीट खरेदी करू शकतात. वंदे भारत मेट्रो ट्रेनचे रेक रेल्वे मंत्रालयाच्या चेन्नईयेथील आयसीएफमध्ये बनवले आहेत.