‘ईद-ए-मिलाद’ची सुट्टी आता १८ सप्टेंबरला; १६ सप्टेंबरला देण्यात आलेली शासकीय सुट्टी रद्द!

मुंबई : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. येत्या मंगळवारी (१७ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी आहे. ११ दिवसांच्या बाप्पाचे या दिवशी विसर्जन होणार आहे. त्याचसोबत सोमवारी ईद-ए मिलाद हा सण आहे. त्यामुळे सोमवारी शासकीय सुट्टी आहे. मात्र मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने ईदची सुट्टी १८ सप्टेंबरला देण्यात आली असल्याचे समजते.

दरम्यान, ईद-ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण आहे. यावेळी जुलूस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि १७ सप्टेंबर ला अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे दोन्ही समाजांमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या उद्देशाने ईद ए मिलादची सुट्टी बुधवारी देण्यात आली आहे.

१८ सप्टेंबर रोजी असणार सुट्टी!

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद- ए- मिलाद सणाची सुट्टी सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शवण्यात आली आहे. ईद- ए- मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण आहे. यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्रामध्ये सोमवारी १६ सप्टेंबर रोजी घोषित केलेली ईद- ए- मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करुन ती आता बुधवारी दि. १८ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे.

शासनाने अधिसूचनेत काय म्हटले आहे?

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिवस विचारात घेऊन सोमवारी, दि. १६ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करुन बुधवारी, दि. १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे शासनाने अधिसूचनेत म्हटले आहे.