संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही; राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर आठवलेंची टीका!

लोकसभा निवडणुकीत संविधान आणि आरक्षणावरुन राहुल गांधींनी धुवांधार प्रचार केला. मात्र आता अमेरिकेतल्या एका वक्तव्याने सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांना चांगलेच घेरले आहे. भारतात पक्षपातीपणा थांबेल तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करु, असे अमेरिकेतून राहुल गांधींनी आरक्षणावरुन वक्तव्य केले आणि आता सत्ताधाऱ्यांनी या वक्तव्यावरून त्यांना जोरदार घेरले असून अनेक राजकीय नेत्यांनी यावरून त्यांना खडेबोल सुनावले आहेत.

दरम्यान, आता यावरून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdaspeth athawale) यांनी देखील राहुल गांधी यांचा चांगलाच समचार घेतलेला आहे. संविधानाने दिलेले आरक्षण कायम राहील. आरक्षण संपविण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे आठवले म्हणाले आहेत.

नेमके काय म्हणाले रामदास आठवले?

राहुल गांधीच्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. जोपर्यंत सूर्य-चंद्र आहे, तोपर्यंत भारताचे संविधान कायम राहील. त्यामुळे खबरदार आरक्षण संपविण्याची भाषा कराल तर, असा इशाराच रामदास आठवले यांनी दिला आहे. तसेच, राहुल गांधींना त्यांच्या या वक्तव्यासाठी दलित आदिवासी मागासवर्गीय लोक नक्कीच धडा शिकवतील. परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे हेच राहुल गांधींचे उद्योग असून हे अतिशय चुकीचे आहे असेही ते म्हणाले. दरम्यान, भारतात लोकतंत्र नाही, असे परदेशात जाऊन बरळणे हे देखील बरोबर नाही, असे आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्याविरुद्ध राज्यभर निषेध आंदोलन देखील करण्यात येणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली आहे.

संविधानाने दिलेले आरक्षण हे कवच कुंडल आहे!

काँग्रेस ही आरक्षण विरोधी असल्याचे आता राहुल गांधींनी या वक्तव्यावरून उघड केले आहे. तसेच, काँग्रेस सर्वाधिक काळ देशात राहिली असून त्यांच्या काळात दलितांवर अधिक अत्याचार झालेत. दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना संविधानाने दिलेले आरक्षण हे त्यांचे कवच कुंडल आहे. त्यामुळे, आरक्षण संपविण्याची भाषा करण्याची राहुल गांधीना गरजच काय होती? असे रामदास आठवले ठणकावून म्हणाले आहेत.

अमित शाह यांची टीका काय?

भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये आणि धर्मा-धर्मात भेदभाव निर्माण करण्याबद्दल बोलणे, यातून राहुल गांधी यांचे फूट पाडण्याचे विचार दिसतात. राहुल गांधींनी देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा देशासमोर आणण्याचे काम केले असल्याचे अमित शाह म्हणाले आहेत.