मणिपूर पुन्हा एकदा हिंसेच्या दिशेने…५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद; २ हजार जवान तैनात!

मणिपूर : गेल्या वर्षभरापासून धगधगत असलेल्या मणिपूर पुन्हा एकदा हिंसेच्या दिशेने जात असून राज्यातील परिस्थिती बिघडली आहे. या बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मंगळवारी (१० सप्टेंबर) राज्यात इंटरनेट आणि मोबाइल डेटावर पाच दिवस बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मणिपूर सरकारच्या निर्णयानुसार राज्यात १५ सप्टेंबर पर्यंत इंटरनेट आणि मोबाईल डेटा बंद राहणार असल्याचे समजते.

दरम्यान, मणिपूर सरकारने इंटरनेट आणि मोबाईल डेटा बंद करण्यासंदर्भात नोटीस जारी केले आहे. तसेच, इथे विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत ५० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

इंटरनेट सेवांवर ५ दिवसांसाठी बंदी!

राज्यातील ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन मणिपूर सरकारने इंटरनेट सेवांवर ५ दिवसांसाठी बंदी घातली आहे. काही समाजकंटक द्वेषपूर्ण संदेश आणि प्रतिमा पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू शकतात, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणखी बिघडू शकते, अशी भीती सरकारने व्यक्त केली आहे. तसेच, राज्य सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सीआरपीएफचे २ हजार जवान तैनात!

जातीय संघर्षग्रस्त मणिपूरमधील सुरक्षा कर्तव्यांसाठी केंद्राने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) नवीन बटालियन्स तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यात सुमारे २,००० कर्मचारी आहेत. बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा सामना करण्यात राज्याचे डीजीपी आणि सुरक्षा सल्लागार अपयशी ठरले आहेत, या कारणामुळे त्यांना पदावरून हटवण्यात यावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. ही मागणी घेऊन ते राजभवनाकडे कूच देखील करत होते.

शाळा आणि महाविद्यालये गुरुवारपर्यंत बंद!

मणिपूर सरकारने राज्यातील सर्व महाविद्यालये आणि शाळा गुरुवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंगळवारी एक आदेश जारी केला असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे महाविद्यालये आणि शाळा बंद राहणार असून, बाहेरील आक्रमकांवर कारवाई करण्याची सरकारकडे मागणी आहे. ८ सप्टेंबरच्या शासन आदेशान्वये बुधवार ते गुरुवारपर्यंत सर्व शासकीय व खाजगी महाविद्यालये बंद घोषित करण्यात आली आहेत. वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या.