नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. एका ३२ वर्षीय सुनेने सासूची हत्या करण्यासाठी स्वतःच्याच चुलत भावांना २ लाख रुपयांची सुपारी दिली. सध्या, सासूच्या हत्येप्रकरणी सुनेला आणि तिच्या दोन चुलतभावांना अटक करण्यात आली आहे. सासू सुनेचे नाते कितीही कटू किंवा गोड असले तरी त्याला काळीमा फासणारी ही घटना नागपुरात घडल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, वैशाली राऊत असे आरोपी सूनेचे नाव आहे, तर सुनिता राऊत (५४ वर्ष) असे हत्या झालेल्या सासूचे नाव आहे. नागपुरातील अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मित्र नगरमध्ये सुनिता राऊत राहत होत्या. त्यांच्यासोबत त्यांची सून वैशाली राऊत आणि तिची ५ वर्षांची मुलगी राहत असल्याची माहिती मिळाली आहे. सुनीता यांचे पती ओंकार यांचे २०१६ मध्ये निधन झाले. तर, २०२३ मध्ये सुनीता यांचा मुलगा म्हणजेच वैशाली चा पती अखिलेश याचाही मृत्यू झाला.
नेमके प्रकरण काय?
पती आणि मुलगा गेल्यापासून सुनीता एकट्या पडल्या होत्या. तसेच, सून वैशालीचा पाय घसरू नये म्हणून तिच्यावर त्या पाळत ठेवत होत्या. मात्र, वैशालीला मोकळेपणा हवा होता. सासू तिच्यासाठी अडसर ठरत होती. त्यामुळे वैशालीने सासूच्या खुनाचा कट रचला आणि सासूचा खून केल्यानंतर संपत्तीवर कुणी दावेदार राहणार नाही, या उद्देशाने तिने चुलत भावांना दोन लाखात सुपारी दिली, आणि सासूचा खून केला, यामध्ये २८ ऑगस्टला ठरल्याप्रमाणे वैशालीने तिच्या साथीदारांना आधीच बोलावून घेतले. घरात सासू, वैशाली आणि मुलगी असे तिघे होते. सर्वांनी जेवण केले. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास वैशालीने मागचे दार उघडले. दोन साथीदार घरात आले आणि वैशाली सुनीता यांच्या छातीवर बसली तर दोघांनी तिचा गळा आवळला व यात सूनिताचा मृत्यु झाला. सकाळी सासू सुनीता यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बातमी वैशालीने तिचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांना दिली. अंत्यसंस्काराची तयारी झाली. घाटावर अंत्यसंस्कारही झाले. मृताच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा दिसल्या. कुठलाच आजार नसताना अचानक कसे काय निधन झाले? असा प्रश्न सगळ्यांना पडला. वैशालीचा मोबाईल तपासला असता त्यात दोन युवकांशी संवाद झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली.
पाच वर्षांच्या चिमुकलीने सांगितले दोन मामा…
पाच वर्षांच्या चिमुकलीने पोलिसांना सांगितले की, मध्यरात्री दोन मामा मागच्या दाराने आले. त्यांनीच आजीचा खून केला. यावरून पोलिसांनी वैशालीची चौकशी करून रहस्य उलगडले. ही कारवाई पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सुशांत उपाध्ये, पंकज बावणे, स्वाती माळी, नितीन सोमकुंवर, अश्विनी सहारे यांनी केली. तसेच, रितेश प्रकाश हिवसे (२७) आणि श्रीकांत उर्फ समीर नरेंद्र हिवसे (२१), अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे असल्याचे समोर आले आहे.