प्रशासनाच्या चुकीचा शेतकऱ्यांना फटका! चक्क नावेतून सुरूयं संत्र्याची वाहतूक, अपघात झाल्यास जबाबदार कोण?

नागपूर – काटोल तालुक्यातील कचारी सावंगा या गावालगत जाम नदी प्रकल्प आहे. जाम नदी प्रकल्पातील पाण्याची थोप गावापर्यंत आली आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना नावेतून ये-जा करावी लागत आहे. शेतमालाची वाहतूक नावेतूनच सुरू आहे. पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने जीवघेणी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

कचारी सावंगा गावातील मुख्य रस्त्यावर नाला आला. नाल्यालगत पाणंद रस्ता आहे. त्या रस्त्यावर अनेक वर्षांपासून अतिक्रमण असल्याने पुढील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचण होत आहे. ग्रस्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग, महसूल विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे अनेकदा विनंती अर्ज, तक्रारी केल्या आहे. मात्र एकही विभाग याची जबाबदारी घेत नसून एकमेकांकडे टोलवाटोलवी करत आहे. अतिक्रमण काढण्याचे आदेश प्राप्त होऊनही पाटबंधारे विभाग आणि महसूल विभाग एकमेकांकडे बोट दाखवत आहे. मात्र याचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. यावर्षी जाम प्रकल्पाचे पाणी गावापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे पाणंद रस्ता पाण्यात बुडाला. परिणामी शेतातील वाहतूक चक्क नावेच्या माध्यमातून होत आहे. दुर्दैवाने एखादी अनुचित घटना घडल्याने याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहे.

महसुल विभागाच्या आदेशाला केराची टोपली

मागच्या 25 वर्षांपासून पाणंद रस्त्यावर अतिक्रमण असल्याने इतर शेतकऱ्यांना जायला रस्ता नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी एसडीओ कार्यालयात रीतसर तक्रार केली. तक्रारीची दखलही घेण्यात आली. पाटबंधारे विभागाच्या नावावर जमीन आहे. शेतकऱ्यांकडून भुसंपादित जमीनीची आराजी कमी करण्यात आली. पोलिसांची मदत घेऊन अतिक्रमण हटवण्याचे निर्देशही देण्यात आले. मात्र पाटबंधारे विभागाकडून हलगर्जीपणा सुरू असल्याचा आरोप शेतकरी आशिष बोलके यांनी केला आहे.

प्रशासनाचे हात वर! प्रश्न सुटणार कधी?

मागच्या 25 वर्षापासून ही समस्या प्रलंबित आहे. कागदी घोड्यांमुळे हा प्रश्न आणखीनच जटील होत चालला आहे. महसूल विभाग पाटबंधारे विभागावर आणि पाटबंधारे विभाग महसूल विभागावर जबाबदारी ढकलत आहे. मात्र यात शेतकरी पेचला जात आहे. शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाही. आता संत्रा-मोसंबी काढण्याचे दिवस आहे. शेतातील माल बाहेर काढण्यासाठी जीवावर उदार होत नावेची मदत घ्यावी लागत आहे. अखेर हा प्रश्न सुटणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.