लाडकी बहिण योजनेनंतर आता “लाडकी बहीण कुटुंब भेट” घरोघरी पोहचणार शिवसैनिक!

ठाणे : महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता घराघरात पोहोचली आहे. राज्यातील लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले आहेत. पण आता शिवसेनेकडून आणखी एक मोहीम राबवली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता शिवसेनेची “लाडकी बहीण, कुटुंब भेट” मोहीम सुरू होणार आहे. शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घरा-घरात पोहोचणार आहेत. इतकेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या मोहिमेत सामील होणार असल्याचे समजते.

दरम्यान, प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील इतर सर्व सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही? तसेच, ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करणार असल्याचे समजते. इतकेच नाही तर यासाठी शिवसेना विशेष मोहीम राबवणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

आज माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही आता कुटुंब अभियान राबवत असून या योजनेसाठी शिवसैनिक घरोघरी जाणार आहेत आणि मी आज पासूनच या अभियानाला सुरुवात देखील केली आहे. यात महाराष्ट्रात एक लाख शिवसैनिक दररोज १५ घरापर्यंत पोहोचतील, म्हणजेच आठवडाभरात आम्ही एक कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहचू असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील हे अभियान असेच सुरू राहील. कार्यकर्ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही? याबाबतचा ट्रॅक रेकॉर्ड आम्ही ठेवणार. तसेच, सरकारच्या काही इतर योजना देखील आहेत त्यांच्या संदर्भात देखील अचूक माहिती आम्ही प्रत्येक परिवाराला देऊ अशी माहिती यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री असलो तरी जमिनीवरचा कार्यकर्ता आहो!

लाडकी बहीण योजनेचा लाभ तर प्रत्येक महिला घेत आहेतच. तसेच, मी देखील मुख्यमंत्री असलो तरी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी आदेश देऊन नव्हे तर रस्त्यावरती उतरून, योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मी स्वतः घरी जात असल्याचे शिंदे म्हणाले. पुढे शिंदेंनी सांगितले की, लाडकी बहिण सारखी योजना एक महिन्यात आली आणि त्याचा लाभही अनेक बहिणींना झाला आजपर्यंत कधीच कुठल्या योजनेविषयी इतक्या जलद गतीने काम झाले नव्हते केवळ आमच्या सरकारने आता लाडकी बहीण योजनेद्वारे हे करुन दाखविले.

शिवसैनिक येणार घरोघरी!

लाडकी बहिण, कुटुंब भेट योजनेंतर्गत शिवसैनिक दररोज १० कुटुंबाना भेट देणार असून शिवसैनिक केवळ १० दिवसात १०० कुटुंबाना भेटणार असल्याचे समजते.