महाराष्ट्र : राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, विदर्भात धुवांधार पावसाची हजेरी लागणार आहे. गेल्या दोन तीन दिवसात काहीसा ओसरलेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. अरबी समुद्रात आता कमी दाबाचा पट्टा पुन्हा तयार झाल्याने मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना IMD चा अलर्ट
आज रविवारी, मुंबई, ठाणे, पालघर तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह साताऱ्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील काही दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट!
आज मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात उद्यापासून पुढील चार दिवस तुरळ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर ओडिशा, दक्षिण पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाची (IMD) माहिती काय?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. ही क्षेत्र आता वायव्य आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्रांमध्ये रूपांतरित झाले आहे . त्यामुळे पुढील काही दिवस कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.