पुणे : पुण्यात गणेशोत्सवात सात हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच, पुण्यात गणेशोस्तवास सुरुवात देखील झाली असल्याचे समजते.
दरम्यान, सात हजार पोलिसांचा (Pune Police) चोख बंदोबस्त गर्दीच्या ठिकाणी आणि शहरातील महत्त्वाच्या भागात तैनात असणार आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्ताचे नियोजन देखील करण्यात आले आहे.
ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर!
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर भाविक मोठमोठ्या शहरात येत असतात, यावेळी अनेकदा सोने, पाकिटे, वस्तू अशा अनेक गोष्टींच्या चोऱ्या होत असतात, या काळात कोणतेही गुन्हे घडू नयेत त्यावर आळा बसावा या कारणास्तव आता शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. शहरात दीड हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर गुन्हे करणाऱ्यांवर राहणार आहे. याबाबत, गणेश मंडळांनाही सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस आयुक्त कार्यालय, अतिरिक्त आयुक्त कार्यालय आणि वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही (CCTV) नियंत्रण कक्षातून संशयितांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे.
भाविकांसाठी मदत केंद्र!
शहराच्या मध्यवर्ती भागात भाविकांसाठी पोलिस मदत केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. तसेच, काही प्रमुख चौकांमध्ये मनोऱ्यावरून गर्दीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या बाहेरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना निश्चित होऊन शहरातील गर्दीत फिरता येणार आहे.
महिलांच्या सुरक्षेला देणार प्राधान्य!
या काळात महिला भाविकांजवळ असलेले दागिने, मोबाइल, पैसे चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. चोरट्यांना रोखण्यासाठी मध्यभागात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महिलांची छेड काढणाऱ्यांना पकडून त्यांचे फोटो चौकात लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांची धिंड काढण्यात येणार असल्याचा इशारा देखील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.