पांढुर्ण्यात जगप्रसिद्ध गोटमार का होते? यामागचं कारण काय? वाचा बातमी

गौरव मानकर – प्रतिनिधी

दंगलग्रस्त भागात चेहऱ्यावर कापड बांधून हातातील दगड भिरकावणारे अनेक आक्रमक व्हिडिओ, फोटो आपण बघितले असतील. यात बहुतांश पोलीसच टार्गेटवर असते. मग नळकांड्या, पाण्याचा फवारा, गोळीबार असं करून हा जमाव पांगवला जातो. पण इथं अगदी विचित्रच मॅटर आहे. नदी पलीकडचे आणि अलीकडचे. तिकडून दगड आणि इकडूनही दगडच. आव्हान – प्रतिआव्हान. पुन्हा गोटमार. त्याला प्रशासनाचं नाईलाजाने संरक्षण. बघणारे हजारोच्या संख्येनं. दिवसभर गोटमार. कारण काय तर म्हणे पांढुर्णाच्या मुलाने सावरगाव पेठची पोरगी पळून आणली. त्याला दोन्ही गावचा विरोध. म्हणून रक्तपात घडवणारी गोटमार.

मध्यप्रदेशातील पांढुर्णा आणि सावगाव पेठ या दोन गावातील हा मामला 300 वर्षापासूनचा आहे. प्रशासनाच्या विरोधानंतरही दोन्ही गावांनी मोठ्या आस्थेनं ही परंपरा कायम ठेवली आहे. शोधुनही सापडणार अशी हिंसक असणारी गोटमारीची परंपरा बघण्यात अंगावर काटा येतो. पोळ्याच्या पाडव्याला या गावात लाखोच्या घरात पब्लिक असते. गावात शिरताच सगळेच भाईगिरीच्या तोऱ्यात जाणवतात. त्यामुळे शो बघणारे गुपचूप गल्लीतून थेट नदीकडे कल्टी मारतात. पांढुर्णा आणि सावरगाव पेठ या दोन गावाच्या मधात जाम नदी आहे. गावांना जोडणारा छोटा पूल आहे. पुलाशेजारी नदीतच छोटे झाड आणि त्यामध्ये पताका, झेंडे लावलेले दिसतात. तो झेंडा जे गाव तोडून आणेल, ते गाव जल्लोष करणार. यात एकमेकांवर दगड भिरकवण्यात अख्या दिवस जातो. काही देशी लावलेले जिगरबाग पूलावर अर्ध्यात येत अंगावरचं शर्ट काढून, मांड्या ठोकत पुढच्या गावाला आव्हान देताना दिसतात. मग पुढच्या गावाकडून जोरदार गोटमार. काही वेळ शांतता मग अचानक जोराचा आवाज आणि गोंधळ वाढत दगडांचा वर्षावर चित्तथरारक वाटतो.

पांढुर्णा आणि सावरगाव दोन गावातील लोक आमने-सामने गोटमार करताना

आपल्याकडे एखादा उत्सव असेल तर पुढारी डेकोरेशन, जेवणाचा खर्च, बॅनरचा खर्च पुरवत असतो. गोटमारीच्या यात्रेला पुढाऱ्यांकडून एक ट्रॉली दगड, दोन ट्रॉली खडक अशी सेवा पुरवतात. गोटमारीत आपले सहर्ष स्वागत आहे, असे बॅनरही चिपकवतात. प्रशासनाचं वरून ड्रोन फिरताना दिसते. मग मधूनच अधिकारी घोषणा करतो, “सावरगाव पेठ आपके तरफ से गोफण चलाई जा रही है. ये बराबर नहीं. दोनों गाव वालो नियमो का पालन करें”. गंमतच आहे. जिल्हा प्रशासन महिनाभरापासून गोटमार यात्रेची तयारी करतात. दोन्ही गावांत परंपरा थांबवण्याच्या बैठका होऊन व्हायचं तेच होतं. यंदाच्या गोटमारीत जवळपास 250 जण जखमी, 5 जण गंभीर जखमी झालेले आहे. दोन्ही गावात 500 पोलिसांचा फौजफाटा, 25 रूग्णवाहिका, आरोग्य पथक, अग्निशमन दल दाखल होते.

गोटमारीच्या परंपरेला कारणीभूत ठरलेल्या दोन आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातली एक कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे. ती म्हणजे, पांढुर्णा गावच्या एका मुलाचे सावरगावच्या एका मुलीशी प्रेम असते. दोन्ही गावातील लोकांचा त्याला विरोध असतो. परंतू तो विरोध झुगारून मुलाने मुलीला पळवून नेले. जाम नदीवरील पुलावर लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. दुसरी कथा ही ऐतिहासिक आहे. पांढुर्णा परिसरात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. आदिवासींमधील पेंडारी समाजाचा जाम नदी किनाऱ्यावर किल्ला होता. दलबत शाह हा त्याचा सेनापती. परंतू नागपूरचे राजा भोसले यांनी त्या किल्लावर आक्रमण केले. दलबत शाह यांच्याकडील शस्त्र संपले. त्यामुळे त्यांनी भोसलेंच्या सैन्यावर दगडफेक केली. दगडफेकीमुळे भोसल्यांना परत जावं लागलं. आदिवासींचा विजय झाला. तेव्हापासून चंडिका मातेच्या साक्षीने गोटमारीची परंपरा सुरू आहे.

गोटमारीच्या परंपरेमुळे आतापर्यंत डझनभराहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. अनेक नशेबाज उत्साहाच्या भरात समोर असतात. अशात जखमी झाल्यावर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. आजूबाजूच्या परिसराचं नुकसान होतं. प्रशासनाने प्रथा थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. परंतू ते सफल झाले नाही. लोकं तर असंही म्हणतात, की एकदा पोलिसांनी सक्तीने गोटमारीवर बंदी आणली. नंतर आपोआपच पोलीस कार्यालयावरही गोटमार झाली. त्यामुळे ती प्रथा सुरूच ठेवणे त्यांच्यासाठी गरजेचे ठरले. महत्त्वाचं म्हणजे व्यापरी वर्गाचे पण परंपरेला प्रोत्साहन असते. निदान 2 दिवस तरी धंदापाणी जोरदार होतो. आता तर सोशल मिडियाच्या प्रसाराने गोटमारीला आणखीनचं प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळं आपणही प्रत्यक्ष गोटमार बघायला काहीच हरकत नाही.