अंडं हा प्रोटिनचा उत्तम स्रोत मानला जातो. त्यामुळे आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. अलीकडे डाएट या संकल्पनेचे महत्त्व वाढले आहे. अनेक जण आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने मोजून मापून आहार घेतात. काही जण नुसतीच उकडलेली अंडी खातात तर काही जण चक्क कच्ची अंडीही घशाखाली उतरवतात. अंडे कितीही पौष्टिक असले तरी ते कच्चे खाण्याचे दुष्परिणाम जाणून घेणे ही तितकेच आवश्यक आहे.
दरम्यान, तज्ञांच्या मते, अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन बी ५, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी ९, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि सेलेनियम सारखे आवश्यक पोषक असतात. या व्यतिरिक्त, त्यात ओमेगा -३, फॅटी ऍसिडस्, DHA आणि EPA सारख्या निरोगी चरबी देखील असतात. यामुळेच अंड्याचा पिवळा भाग खाण्याऐवजी काही लोक प्रथिनांसाठी अंड्याचा इतर भाग खातात.
कच्ची अंडी खाल्ल्याने वाढतात हे आजार!
कच्ची अंडी आरोग्यासाठी चांगले आहे, हा केवळ एक गैरसमज आहे. मात्र यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टीनल सारखे आजार वाढू शकतात. काही जण आपल्या मनानेच रिकाम्या पोटी कच्ची अंडी खायला सुरुवात करतात पण हे चुकीचे आहे कारण अस अंड पचायला जड असते. ते खाल्ल्यास गॅसेस, पोटदुखी, सूज येणे, बद्घकोष्ठता असे त्रास होऊ शकतात. कच्च्या अंड्याला उग्र वास असतो. त्यामुळे उलटी, मळमळ असे त्रास होऊ शकतात. दररोज एक कच्च अंडं खाल्ल्यास पचन क्रियेवर ताण येऊ शकतो. ज्यांना अंड्याची ॲलर्जी असते त्यांनी कोणत्याही प्रकारे ते खाणे टाळावे किंवा खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ!
अंड्यासह दूध, दही, पनीर आणि चीज सेवन करू नये. अंड्यासह दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास शरीर जड होते. यामुळेही अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.
टीप : वरील टिप्स केवळ माहिती करिता असून कुठलाही प्रयोग करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.