सरकार ‘या’ कंपनीतील ३.३९ टक्के हिस्सा विकणार; गुरुवारी शेअर्स खरेदीसाठी बोली!

सरकार जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) मधील आपला हिस्सा विकणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. सरकार कंपनीतील ६.७८ टक्के भागभांडवल ३९५ रुपये प्रति शेअर या दराने विकणार असल्याचे समजते. या सरकारी कंपनीमध्ये सरकारची ६.७८ टक्के भागीदारी ११.९० कोटी शेअर्सच्या बरोबरीची आहे. शेअर्सची ही विक्री OFS च्या माध्यमातून केली जाईल. ही ऑफर बुधवारी संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी खुली होईल. तर किरकोळ गुंतवणूकदार गुरुवारी शेअर्स खरेदीसाठी बोली लावू शकतील.

११.९० कोटी शेअर्सच्या विक्रीतून सरकारी तिजोरीत किती पैसे येणार?

३९५ रुपये प्रति इक्विटी शेअर या दराने ११.९० कोटी शेअर्सची विक्री केल्याने सरकारी तिजोरीत सुमारे ४,७०० कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या शेअर्सच्या मंगळवारच्या बंद किंमतीपेक्षा ही किंमत ६.२३ टक्के कमी आहे. मंगळवारी जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे शेअर्स बीएसईवर ०.५५ रुपयांनी घसरून ४२१.२५ रुपयांवर बंद झाले आहे.

सरकार कंपनीतील ३.३९ टक्के हिस्सा विकत आहे!

तुहित कांत पांडे हे सचिव गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM)) प्रमुख आहेत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) साठी OFS बुधवारी उघडेल. बिगर किरकोळ गुंतवणूकदार बुधवारी बोली लावू शकतील तर रिटेल आणि जीआयसी कर्मचाऱ्यांसाठी इश्यू गुरुवारी उघडला जाईल. सरकार कंपनीतील ३.३९ टक्के हिस्सा विकत आहे आणि जास्त बोली लागल्यास, अतिरिक्त ३.३९ टक्के हिस्सा विकण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये सरकारचा ८५.७८ टक्के हिस्सा!

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये सरकारची एकूण ८५.७८ टक्के हिस्सेदारी आहे. तसेच, ही सरकारी विमा कंपनी ऑक्टोबर २०१७ मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली होती. सरकारने जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या IPO मधून ९,६८५ कोटी रुपये उभे केले होते.