भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. २०२२ च्या अखेरीस कार अपघातात जखमी झाल्यानंतर, पंतने क्रिकेटच्या मैदानावर जोरदार पुनरागमन केले आणि टी२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचा एक भाग बनला. पंत सोशल मीडियावरही सक्रिय आहे. दरम्यान, पंतबाबत एक मोठी बातमी समोर येत असून ही बातमी सोशल मीडियावरून समोर आलेली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एका मुलाने कॉलेजची फी भरण्यासाठी आर्थिक मदत मागितली. यामध्ये त्या मुलाने पैसे परत करणार असल्याचे देखील म्हटले. कार्तिकेय मौर्य नावाच्या विद्यार्थ्याने आज (मंगळवार) सोशल मीडियावर आपली अभियांत्रिकीची फी भरण्यासाठी निधी गोळा करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्याच्या फीसाठी ऋषभ पंतचे ९०,००० चे योगदान!
विद्यार्थ्याने सोशल मीडियावर लिंक शेअर केली आणि क्रिकेटर ऋषभ पंतला टॅग केले. युजरच्या या पोस्टनंतर काही वेळातच पंतनेही त्याला प्रत्युत्तर दिले. विद्यार्थ्यांच्या फीसाठी ऋषभने तब्बल ९०,००० रुपयांचे योगदान दिले. याबद्दल कार्तिकेयने ऋषभचे आभारही मानले. यासोबतच ऋषभ म्हणाला की, तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा. देवाच्या नेहमी चांगल्या योजना असतात, असे म्हणत त्याने विद्यार्थ्याला मदत केली आणि ऋषभ पंतच्या या स्तुत्य पावलाचे आता खूप कौतुकही होत आहे.
विद्यार्थ्याची सोशल मीडियावर पोस्ट काय?
नमस्कार, माझे नाव कार्तिकेय मौर्य आहे आणि मी चंदीगड विद्यापीठात माझी अभियांत्रिकी पदवी घेत आहे. शिक्षण हे नेहमीच माझे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि मी अर्धवेळ नोकरी करून माझ्या अभ्यासासाठी वित्तपुरवठा करण्याचा प्रयत्न केला. पण काम आणि शिक्षणाचा समतोल राखणे हे आव्हानात्मक होते आणि मी माझ्या कुटुंबावर ओझे न आणता माझी स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. तरीही आयुष्याला अनपेक्षित वळण मिळाले. गेल्या काही महिन्यांपासून, मी स्थिर रोजगार शोधण्यासाठी संघर्ष करत आहे आणि माझी बचत कमी झाली आहे. माझे सर्व प्रयत्न करूनही मला नवीन नोकरी मिळाली नाही आणि माझ्या कॉलेजची फी भरण्याचा ताण खूप वाढला आहे. तुमची साथ माझे आयुष्य बदलू शकते. कृपया मला मदत करा किंवा माझी मोहीम शेअर करा.