गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने दोन दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे बाहेर पडणेही अवघड झाले आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पुणे, साताऱ्याला ‘रेड अलर्ट’ दिला आहे. तर काही भागांत यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार ओला आठवडा सोमवारपर्यंत कायम राहणार असला तरी पावसाचे प्रमाण कमी होईल. रविवारी आणि सोमवारी ‘तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस’ असणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट!
२५ ऑगस्ट रोजी पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट दिला आहे. या काळात अतिवृष्टीसह पाऊस होऊ शकतो. तर, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, नाशिक,धुळे, नगर, नंदुरबार, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज!
राज्यात मुसळधार पाऊस होत असताना महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत पसरले आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
शनिवारी काही भागांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस!
शनिवारी मुंबईच्या काही भागांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत ठाणे येथे १०७ मिमी तर मुलुंडच्या वीणा नगरमध्ये १०२ मिमी पावसाची नोंद झाली. कुर्ल्यातील एकसार येथे ९४ मिमी आणि एलबीएस मार्गावर अनुक्रमे ९४ मिमी आणि ९३ मिमी आहे.