पुण्यात शरद पवारांच्या नेतृत्त्वात निषेध आंदोलन; विरोधक झालेत चांगलेच आक्रमक!

पुणे : बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात तर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणामुळे विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केलीय. या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्रभर निदर्शन करण्यात येत आहे. पुण्यात तर शरद पवार (Sharad pawar) यांच्या नेतृत्त्वात निषेध आंदोलन होत आहे.

दरम्यान, आंदोलनाच्या स्थळी शरद पवार यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसते आहे.

विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका!

विरोधकांकडून सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. दरम्यान, आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. मात्र तरीही महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले जाणार आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. याच घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून सरकारविरोधात शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरण काय?

बदलापूरमध्ये एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमधील नागरिक आक्रमक झाले होते. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संबंधित शाळेच्या बाहेर येऊन आंदोलन केले होते. तर काही आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रोखून धरल्या होत्या. सकाळी चालू झालेले हे आंदोलन संध्याकाळपर्यंत चालले होते. या प्रकरणातील आरोपीला आत्ताच्या आता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जनतेने केली होती.