‘महाराष्ट्र बंदमध्ये’ महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन!

मुंबई : महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भात काल (गुरुवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करत राज्यात आणि देशात वाढत चाललेल्या या वृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी हा बंद असल्याची माहिती दिली. त्यामुळे या बंदमध्ये मोठ्या संख्येने लोकांनी, महिलांनी, मुलींनी सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरेंकडून करण्यात आले.

दरम्यान, काल (गुरुवार) मुंबईतील शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये बदलापूर मधील घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या घटनेची केवळ निंदा करून भागणार नाही. या घटनेमुळे जनतेच्या मनात प्रचंड खदखद आहे. जनतेच्या मनात एक उद्वेग आहे. या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीने २४ ऑगस्टला बंद पुकारले असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

हा कोणत्याही राजकीय पक्षाचा बंद नाही. आपल्या माता-भगिनींसाठी आपण किती जागृत आहोत हे दाखवणारा हा बंद आहे. विकृतांच्या मनात दहशत बसवण्यासाठी हा बंद आहे. संवेदनाहीन व्यवस्थेच्या विरोधात हा बंद आहे. कुणीही असे दुष्कृत्य करण्यास धजावू नये आणि असे काही झालेच तर त्याला ताबडतोब शिक्षा व्हावी यासाठी हा बंद आहे, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, अशा घटना घडल्या की काही दिवस लोक आक्रमक होतात, नंतर सगळे थंड होऊन जातात. मात्र, आता थंड बसून चालणार नाही. हे सरकार हलत नाही, केवळ राजकारण करत आहे. कोरोनाच्या काळात जसा महाराष्ट्र एक कुटुंब म्हणून लढला होता, त्याच प्रकारे या विकृतीविरोधात महाराष्ट्राला कुटुंब म्हणून लढावे लागेल, असे देखील ते म्हणाले.

महाराष्ट्र बंदमध्ये कशाकशाचा समावेश?

महाराष्ट्र बंदचा कोणकोणत्या सुविधांवर परिणाम होणार याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु सार्वजनिक वाहतूक सेवा आणि काही खाजगी कार्यालयांवर त्याचा परिणाम दिसण्याचा अंदाज आहे. स्थानिक स्तरावरील काही दुकानांवर याचा परिणाम होऊ शकतो, मात्र बहुतांश दुकाने आणि बाजारपेठा खुल्या राहतील, असे समजते.