नेपाळ : नेपाळमधील पोखराहून काठमांडूला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बसमधून ४० भारतीय प्रवासी प्रवास करत होते. माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत १४ भारतीय प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तानाहून जिल्हा पोलीस कार्यालयाचे डीएसपी दीपकुमार राय यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, या अपघातस्थळी बचावकार्य सुरू असून या अपघातात १४ हून जास्ती लोक गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत नेपाळ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४० जणांना घेऊन जाणारी भारतीय प्रवासी बस तानाहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली. तसेच, यूपी एफटी ७६२३ नंबर प्लेट असलेली ही बस पोखराहून काठमांडूला जात होती.
बसमध्ये महाराष्ट्रातील ४२ प्रवासी!
बस गोरखपूरच्या केसरवाणी ट्रॅव्हल एजन्सीची असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ४२ प्रवासी येथे प्रवास करत होते म्हणजेच सर्व जण महाराष्ट्रातील भुसावळ येथील रहिवासी असल्याचे समजते. अपघातानंतर १५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, प्रवाशांनी अलाहाबाद रेल्वे स्थानकावरून प्रवास सुरू केला. त्यानंतर ही बस चित्रकूट धाममार्गे अयोध्येला गेली होती. तेथून काठमांडूला जात असताना हा अपघात घडला. यात्रेकरुंच्या तिन्ही बसमध्ये ११० प्रवासी होते. त्यापैकी ४२ प्रवासी ज्या बसमध्ये प्रवास करत होते त्या बसचा अपघात झाला आहे.
नेमका कुठे झाला अपघात?
ही बस अचानक नेपाळमधील तानाहुन येथील अबुखैरेनी येथे मर्स्यांगडी नदीत कोसळली. नेपाळच्या मर्स्यांगडी अंबुखैरेनी ग्रामीण नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक २ मध्ये असलेल्या ऐन पहाराजवळ बस नदीत कोसळली आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी अपघातस्थळी पोहोचले आहेत. अपघाताबाबत सैन्यदल आणि सशस्त्र दलांना माहिती देण्यात आली असून बचावकार्य सुरू आहे.