MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळाले यश; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

पुणे : आज (गुरुवार) झालेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच, एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर २५ ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असून एमपीएससीच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून पुण्यात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) मुख्यमंत्र्यांबरोबर एमपीएससीच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते.

विद्यार्थ्यांची मागणी काय?

पुण्यामध्ये मंगळवारपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. बुधवारी रात्री पुण्यातील रस्त्यांवर उतरुन विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर आज सकाळपासून त्यांनी रस्ता आडवून धरला होता. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे म्हणजेच एमपीएससी मार्फत २५ ऑगस्ट रोजी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी २५८ पदांचा समावेश करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. याच मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी पुण्यात मंगळवारी रात्रीपासून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. बुधवारी रात्रभर हे आंदोलन सुरू होते. मात्र आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

आंदोलनाला मिळालं मोठ यश!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षार्थ्यांनी पुण्यामध्ये केलेल्या आंदोलनाला आता मोठं यश मिळालं आहे. आजच्या बैठकीमध्ये एमपीएससी कृषी आणि आयबीपीएस विषयावर चर्चा झाली असून यात महाराष्ट्र शासनाने लोकसेवा आयोगाला कृषीच्या २५८ पदांचा समावेश करावा अशी अधिकृतपणे विनंती केली. यासोबतच, आयबीपीएस परीक्षा देखील २५ ऑगस्ट रोजी असल्याने एमपीएसीची परीक्षा देखील पुढे ढकलण्याची विनंती यावेळी करण्यात आली. दरम्यान, आता एमपीएससी परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने जाहीर केले आहे.