महाराष्ट्र : बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला. या संपूर्ण प्रकाराचे पडसाद आता राज्यासह देशातही उमटत असताना राज्यात गेल्या दोन दिवसांत अशाच प्रकारची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. बदलापूर पाठोपाठ राज्यात पुणे, अकोला, ठाणे, मुंबई येथे देखील अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या घटना उजेडात आल्या आहेत.
दरम्यान, बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच आता अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातही असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. इथे देखील शाळेत एका शिक्षकाने सहा विद्यार्थिनींचा छळ केल्याची ही घटना घडली आहे. शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हीडीओ दाखवत त्यांचा छळ केला. सध्या या प्रकरणातील संशयित आरोपीला सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई झाली आहे.
नाशिकमध्येही साडेचार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार!
२१ ऑगस्टला नाशिक येथे सिन्नर तालुक्यातील साडेचार वर्षे मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. चिमुकली घरासमोर खेळत असताना त्याच गावात राहणाऱ्या संशयिताने मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेत मुलीची सुटका केली असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार!
पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ठाण्यात गतिमंद मुलीवर अत्याचार!
२० ऑगस्टला कळवा रुग्णालय परिसरातील गार्डनमध्ये एका अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आला. विनयभंग केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तसेच, पोलिसांनी सीसीटिव्ही व तांत्रिक माहितीच्या मदतीने आरोपीला अटक केली असून प्रदीप शेळके असे आरोपीचे नाव आहे.
मुंबईच्या खारमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजार्याकडून विनयभंग!
२१ ऑगस्ट मुंबईच्या खार दांडा परिसरातून देखील अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे. यात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलींच्या आई वडिलांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.