आयसीसीचे नवे अध्यक्ष होणार जय शाह; अध्यक्षांचा कार्यकाळ १ डिसेंबर पासून सुरू! 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी त्यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मंगळवारी तिसऱ्या टर्मच्या शर्यतीपासून स्वतःला दूर केले. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह हे आयसीसीचे नवे अध्यक्ष होतील अशा चर्चेला सध्या उधाण आले आहे.

दरम्यान, या पदासाठी जय शाह आपला दावा मांडणार की नाही हे २७ ऑगस्टपर्यंत स्पष्ट होईल, कारण ही अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आयसीसी अध्यक्ष प्रत्येकी दोन वर्षांच्या तीन टर्मसाठी पात्र आहेत आणि न्यूझीलंडचे वकील बार्कले यांनी आतापर्यंत चार वर्षे पूर्ण केली आहेत.

आयसीसी (ICC) अध्यक्षांसाठी काय आहेत नियम?

आयसीसी नियमांनुसार, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ मते आहेत आणि आता विजेत्यासाठी नऊ मतांचे साधे बहुमत (५१%) आवश्यक आहे. यापूर्वी अध्यक्ष होण्यासाठी विद्यमान उमेदवाराला दोन तृतीयांश बहुमत आवश्यक होते. मात्र आता आयसीसीने म्हटले आहे की, विद्यमान संचालकांना आता २७ ऑगस्ट २०२४ पर्यंत पुढील अध्यक्षांसाठी अर्ज सादर करावे लागतील आणि जर एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर निवडणूक होईल आणि नवीन अध्यक्षांचा कार्यकाळ हा १ डिसेंबर २०२४ पासून सुरू होईल, अशी माहिती मिळाली आहे.

जय शाह अध्यक्षपदासाठी अर्ज करणार?

जय शाह आयसीसीच्या अध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. २०१९ साली जय शहा यांनी बीसीसीआयच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. २०२५ मध्ये त्यांच्या सचिव पदाच्या कारकिर्दीला ६ वर्षे पूर्ण होत आहेत. यासह जय शहा सध्या आयसीसीमध्ये आर्थिक आणि व्यावसायिक प्रकरणांचे प्रमुख आहेत. तसेच, १६ पैकी बहुतांश मतदान सदस्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत.