नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी केंद्र सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरणाचा खरपूस समाचार घेतला आहे. निवडणूक आयोगाने १६ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. मात्र महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केलेली नाही. केवळ वन नेशन, वन इलेक्शनबाबत बोलायचे आणि चार राज्यांच्या निवडणुका एकत्र का घेत नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
दरम्यान, नागपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात त्यात काहीही तथ्य नाही, असेही म्हटले.
काय म्हणाले शरद पवार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना सर्व देशांच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात अशी भूमिका मांडली. मात्र ती भूमिका मांडून १२ तास होत नाही तरीही तेच आपल्याला ऐकायला येते की, जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली, हरियाणाची झाली. मात्र महाराष्ट्र आणि झारखंडची झालेली नाही. देशात एकाच वेळी निवडणुका घ्यायचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडत असताना महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भातील निवडणूक आयोगाचा निर्णय एकप्रकारचा विरोधाभास आहे, असे शरद पवार म्हणाले.
देशात शांततेची गरज!
बांग्लादेशमधील हिंसाचार आणि त्याचे भारत आणि विशेषत: महाराष्ट्रावर होत असलेल्या परिणामांवर बोलताना शरद पवार म्हणाले, पश्चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशला लागून आहेत. पण तिथे काही घडले त्याचे परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळतील, असे कधी घडले नाही. या घटनेच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. मात्र देशात सामजस्य आणि एक वाक्यता याची गरज आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील निवडणुकांची तारीख जाहीर झाली नाही?
केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, अगोदर महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका सोबत होत होत्या. मात्र तेव्हा जम्मू काश्मीर विधानसभा नव्हत्या. आम्ही यावेळेस हरियाणा आणि जम्मू कश्मीरच्या विधानसभा निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरसाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागणार आहे. महाराष्ट्रात आता पाऊस पडला आहे. गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री आणि दिवाळी असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. मात्र विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच महाराष्ट्रात निवडणुका होतील.