धुळे: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राज्य सरकारने शनिवारी पुण्यात लाडक्या भगिनींच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसही महिलांसंदर्भातील योजनांबाबत राज्यात यात्रा काढत आहे; परंतु विरोधकांनी मात्र यावरुन टीकेची झोड उठवली आहे. या योजनेमध्ये काही घोळ घालण्यात आल्याचा आरोप आता खासदार सुप्रिया सुळे ( Supriya sule) यांनी केला आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेमध्ये गफला झाला असेल तर त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
मुख्यमंत्र्यांच्या पोटातले आता ओठात येत आहे. आम्हाला सत्ता द्या लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू, असे ते सांगत आहेत. आम्ही कधीही अशी भाषा वापरलेली नाही. लाडकी बहीण योजनेशिवाय या सरकारकडे सांगायला काहीही नाही. महिन्याला पंधराशे रुपये देऊन मते विकत घेण्याचा कार्यक्रम सरकारने केलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे चुकीचे फॉर्म भरले असेल तर ती सरकारची चूक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अशी चूक झाल्याची कबुली दिली आहे. लाडकी बहीण योजनेत गफला झाल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीच म्हणत आहेत, तर याची चौकशी ईडी, सीबीआयकडून करावी, असे पत्र मला केंद्र सरकारला लिहावे लागणार आहे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
बँकेत गोंधळ सुरू!
लाडकी बहीण योजनेमुळे बॅंकांमध्ये गोंधळ देखील झाल्याचे दिसते. सतत बँकांमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे बँकेत गोंधळ सुरू असते. हे सरकार मिस मॅनेजमेंटचे सरकार आहे. या सरकारकडून मला काहीही अपेक्षा नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
स्वार्थासाठी एकत्र आलेले सरकार!
हे सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी पक्ष फोडण्याचा प्रकार केला असून अदृश्य शक्तीने आमच्याकडून पक्ष चिन्ह ओरबाडून घेतले. आजही सुप्रीम कोर्टात त्याबद्दलची केस सुरू आहे. ईडी, सीबीआयचा वापर करून पक्ष फोडण्याचे काम या सरकारने केले, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.