आज १५ ऑगस्टच्या दिवशी देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा!

नवी दिल्ली : आज भारताने १५ ऑगस्ट रोजी आपला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला अख्ख्या देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. आजच्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि राष्ट्रध्वज फडकावला जातो. तसेच, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावून देशाला संबोधित केले. यामधे त्यांनी विकसित भारतासाठी नवा संकल्प साधला असून महिला आणि तरूणांसाठी कोणत्या खास घोषणा त्यांनी केलेल्या आहेत? हे सर्वांसाठीच जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी भाषणात आतापर्यंतच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. याशिवाय रोजगार, सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील कामगिरी या विषयांवरही भाष्य केले. तसेच, विकसित भारताबाबत सरकारची रूपरेषाही त्यांनी सांगितली. यासोबतच, सीमा सुरक्षा आणि दहशतवाद यांसारख्या मुद्द्यांवरही त्यांनी देशाला संबोधित केले.

२०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय!

१० वर्षांत तरुणांच्या चेतनेमध्ये नवीन ऊर्जा संचारली आहे. आज जगाचा देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. रोजगाराच्या असंख्य नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. देशातील तरुण आता हळूहळू पुढे जाण्याचा हेतू बाळगत नाहीत, तर मोठी झेप घेत आहेत. भारतासाठी हा सुवर्णकाळ आहे. ही संधी आपण हातातून जाऊ देऊ नये. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. २०४७ पर्यंत विकसित भारताचे आमचे ध्येय आहे, असे नरेंद्र मोदी म्हणालेत.

प्रत्येक भारतीयांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार!

‘विकसित भारत २०२७’ फक्त शब्द नाही, यामागे प्रचंड मेहनत सुरू आहे. प्रत्येक देशवासीयाची स्वप्ने त्यात प्रतिबिंबित होत आहेत. तरूण असोत, वृद्ध असोत, गावातील लोक असोत, शहरवासी असोत, शेतकरी असोत, आदिवासी असोत, दलित असोत, महिला असोत, प्रत्येकाची स्वप्ने ‘विकसित भारत २०४७’मध्ये असतील. त्यावेळी देश विकसित भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करेल. यासाठी कुणी कौशल्य भांडवल तयार करण्याचा सल्ला दिला, कुणी भारताला उत्पादन केंद्र बनवण्याचा सल्ला दिला, कुणी विद्यापीठे जागतिक बनवण्याची सूचना केली आहे. आपली कौशल्ये ही तरुण जगाची पहिली पसंती बनली पाहिजे, असे मोदी म्हणाले.

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा सुरूच राहणार!

आपला प्रत्येक देशवासीय भ्रष्टाचारामूळे हैराण झाला आहे, त्यामुळे आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी लढाई सुरू केली आहे. याची किंमतही त्यांना चुकवावी लागली आहे, पण त्यांची प्रतिष्ठा देशापेक्षा मोठी असू शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच, भ्रष्टाचाऱ्यांवर नक्कीच कारवाई होईल. मला त्यांच्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण करायचे आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्याची परंपरा मला थांबवायची आहे, असेही ते म्हणाले.

वैद्यकीय महाविद्यालयात ७५ हजार जागा वाढणार!

पंतप्रधान म्हणाले की, वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देशाबाहेर जावे लागते. येणाऱ्या पाच वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयात ७५ हजार जागा वाढवण्याचा संकल्प केला आहे.

चांगल्या धोरणांमुळे देशाचा विकास!

जेव्हा धोरण योग्य असते आणि हेतू चांगला असतो, तेव्हा निश्चित परिणाम मिळतात. आज देशात नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. विकासात झेप घेणाऱ्या दोन गोष्टी आहेत. प्रथम आधुनिक पायाभूत सुविधा आहे आणि दुसरीकडे सामान्य जनतेचे अडथळे दूर करण्यावरही भर देण्यात आला आहे. गेल्या दशकात पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास झाला आहे. प्रत्येक गावात शाळा, रस्ते, बंदरे, रेल्वे, वैद्यकीय महाविद्यालय, आयुष्मान आरोग्य मंदिर, अमृत सरोवर, असे अनेक विकासाची कामे केली. चार कोटी गरीब लोकांना कायमस्वरूपी घरे देण्यासाठी प्रयत्न केले, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.