पुणे : पुण्यातील सर्वात मोठे आणि जागृत देवस्थान असलेले सेनापती बापट रोडवरील चतु:श्रृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुणेकरच नाही तर जगभरातील भाविक या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. येत्या नवरात्रीसाठी चतुर्श्रुंगी मंदिराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यामुळेच चतुर्श्रुंगी देवीमंदिराच्या जेर्णोद्धाराच्या कामासाठी एक महिना दर्शन बंद राहणार असल्याची सूचना मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, श्री चतुर्श्रुंगी देवीचे मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाकरिता १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. त्यासाठी भाविकांनी देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.
नवरात्रीत मंदिरात महापूजा!
नवरात्र उत्सवाच्या वेळी अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा या मंदिरात होते. दररोज सकाळी १० आणि रात्री ८ वाजता महाआरती केली जाते. नवरात्रीत मंदिर २४ तास भाविकांसाठी दर्शनासाठी खुले असते. पोलीस यंत्रणा, खासगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक यांची व्यवस्थाही केली जाते.
चतु:श्रृंगी मंदिराचा इतिहास!
पेशव्याच्या काळात सुमारे ३०० वर्षापूर्वी दुर्लक्षे नावाने पेशव्यांचे सावकार होते. ते पेशव्यांच्या मोहिमांना कर्ज द्यायचे. नाशिकच्या वणीच्या सप्तश्रृंगी मातेचे परमभक्त होते. प्रत्येक चैत्र आणि अश्विन पौर्णिमेच्या दोन्ही नवरात्रोत्सवात हे सावकार त्याकाळी प्रवास करुन दर्शनासाठी जायचे आणि देवीची सेवा करायचे. घोडा गाडी, बैल गाडी तर कधी चालत ते देवीची सेवा करण्यासाठी वणीला जायचे. असे अनेक वर्ष त्यांनी देवीची सेवा केली मात्र वृद्धापकाळाने त्यांना वणीला जाणे शक्य नव्हते. देवीची सेवा करता येणार नसल्याने त्यांना दुःख झाले. त्यावेळी देवीने त्यांचे दुःख जाणले आणि देवी भक्तासाठी प्रकट झाली. पुण्याच्या डोंगरावर उत्खनन करायला सांगितले. माझी मूर्ती मिळेल असेही सांगितले. सांगितलेल्या ठिकाणी भक्ताने उत्खनन केल्यानंतर भक्ताला चांदळास्वरुप (मुखवटा) मूर्ती मिळाली. त्याप्रमाणे भक्तासाठी ही देवी पुण्याच्या चतु:श्रृंगी नावाने प्रकट झाली. देवी प्रकट झाल्याने त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांची टांकसाळ होती. त्या टांकसाळीत त्यांनी देवीचा एक चांदीचा रुपया बनवला आणि त्याकाळी त्यांनी चतु:श्रृंगी या नावाने रुपया प्रचलित केला होता.