शिल्पगंधर्व सदाशिव साठे यांच्या जीवनावर आधारित ‘हा ध्यास जीवनाचा’ या पुस्तकाचे प्रदर्शन! ‘या’ तारखेला समारंभ!

मुंबई : स्मृती संग्रहालय आणि ग्रंथाली यांच्यातर्फे शिल्पगंधर्व सदाशिव साठे यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या ‘हा ध्यास जीवनाचा’ या आत्मकथनात्मक पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. १४ ते १५ ऑगस्ट २०२४ रोजी वरळीतील नेहरू सेंटर येथे सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. सतीश कान्हेरे यांनी ‘हा ध्यास जीवनाचा’ या पुस्तकाचे सहलेखन आणि शब्दांकन केले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आणि प्रमुख वक्ते म्हणून राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. चित्रकार व कला अभ्यासक सुहास बहुळकर आणि चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रवी जाधव या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शिल्पकार सदाशिव साठे हे जागतिक दर्जाचे शिल्पकार आहेत. ते ऑल इंडियन स्कल्पचर्स असोसिएशनचे संस्थापकही होते. दिल्लीमधील महात्मा गांधींचे शिल्प त्यांनी साकारले आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही त्यांनीच साकारलेला आहे.

आजच्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन!

गेट वे ऑफ इंडियाच्या समोरचा अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा, ग्वाल्हेर येथील झाशीच्या राणीचा पुतळा, दिल्लीत लाल किल्ल्यासमोरच्या उद्यानात नेताजी बोस यांचे बंदूकधारी सैनिकांसह आक्रमक पवित्र्यातील समूहशिल्प, आसाम गुवाहाटी येथे गांधीचे शिल्प, चंदीगड येथे येशू ख्रिस्त, पंजाबात क्रांतिकारकांची शिल्पे, शिवस्मारके, यशवंतराव चव्हाण, जयप्रकाश नारायण, राधाकृष्णन, अटलबिहारी वाजपेयी अशा बऱ्याच महारथींची आणि अनेक प्रख्यात शिल्पे ज्यांनी साकारली त्या सदाशिव साठे यांचे कार्य आत्ताच्या पिढीपर्यंत पोहचून त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सदाशिव साठे यांचे सुपुत्र श्रीरंग साठे यांनी सांगितले.