पावसाचा जोर आणखीन वाढणार? ‘या’ राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस!

भारतीय हवामान खात्याने पावसाबाबतचा एक नवीन अंदाज वर्तवला आहे. या नवीन अंदाजानुसार पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. खरे तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा मान्सून हा मजबूत असल्याचे जाणवत आहे. मान्सूनच्या अगदी सुरुवातीलाच महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असता जून महिन्यात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी होते.

मात्र गेल्या वर्षाच्या मान्सूनसोबत तुलना केली तर यंदाच्या जून मध्ये देखील खूपच चांगला पाऊस झालाय. जुलै महिन्यात तर पावसाचा जोर खूपच वाढला होता. जुलै महिन्यात काही ठिकाणी पूरस्थिती देखील तयार झाली होती. दरम्यान ऑगस्ट महिन्याची सुरुवातही चांगल्याच जोरदार पावसाने झाली असून सध्या पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. मात्र भारतीय हवामान खात्याने पावसाचा जोर आणखीन वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे.

कुठल्या राज्यात ओसरणार पाऊस?

पुढील दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. तसेच, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १५ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कमी असणार आहे. मात्र पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोकणात काही जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असून, विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर, दक्षिण कोकणात २२ ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लोणावळ्यात पुन्हा पावसाची हजेरी!

लोणावळ्यात मागील आठवड्यात मुसळधार पाऊसाने हजेरी लावली होती. त्यामुळे लोणावळ्यातील जनजीवन देखील विस्कळीत झाले होते. त्यानंतर पुढील तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता विकेंडला पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने पर्यटकांना पावसाची ही पर्वणी मिळणार आहे.