सध्या श्रावण महिना सुरु असून जवळपास अनेकजण नॉन व्हेज खात नाहीत, त्यामुळे शुद्ध शाकाहारीचा थाट (Veg Thali Price) पाहायला मिळतो. अनेक शाकाहारी हॉटेलमध्ये श्रावण महिन्यात गर्दी पाहायला मिळते. मात्र तुम्हीही शुद्ध शाकाहारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे की, आता शाकाहारी थाळीचे दर वाढले आहेत. दरम्यान, जुलै २०२४ मध्ये घरगुती शिजवलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किंमती महिन्या-दर-महिन्यानुसार अनुक्रमे ११ टक्के आणि ६ टक्क्यांनी वाढल्या असल्याचे समजते.
थाळीचे दर वाढण्यामागे कारण काय?
अन्नधान्ये, डाळी, भाज्या, मसाले, खाद्यतेल आणि स्वयंपाकाचा गॅस यांच्या किमतीतील बदलाचा परिणाम थाळीच्या किमतीवर झाला आहे. थाळीच्या किमतीतील वाढीत सर्वाधिक ७ टक्के योगदान एकट्या टोमॅटोचे आहे. जूनमध्ये ४२ रुपये किलो असलेले टोमॅटो जुलैमध्ये ५५ टक्के वाढून ६६ रुपये किलो झाले. दरम्यान, टोमॅटो शिवाय कांदा आणि बटाट्याच्या किमतीत सुद्धा अनुक्रमे २० टक्के आणि १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कमी रब्बी उत्पादनामुळे कांद्याच्या किमतीवर परिणाम झाला, तर पंजाब, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये उशिरा झालेल्या ब्लाइटच्या संसर्गामुळे बटाट्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच शाकाहारी थाळी महागली, असे समजते.
मांसाहारी थाळीही महाग!
शाकाहारी थाळीच्या तुलनेत मांसाहारी थाळीची किंमत कमी असण्याचे कारण म्हणजे या थाळीमध्ये ५० टक्के वाटा असलेल्या ब्रॉयलरच्या किमती स्थिर आहेत. मांसाहारी थाळी मासिक आधारावर महाग झाली असेल, परंतु वार्षिक आधारावर त्याची किंमत कमी झाली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये या थाळीची किंमत ६७.८ रुपये होती, जी या जुलैमध्ये ६१.४ रुपयांवर आली आहे.
टोमॅटोचे भाव वाढण्याचे कारण?
टोमॅटोचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने काही शहरांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केली आहे. असे असले तरीदेखील दरात वाढ होताना दिसत आहे. हवामानाचा मोठा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे. देशातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे पिकाचे मोठे नुकसानही झालेले आणि म्हणूनच, टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होत आहे. पुढच्या काळात आणखी टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.