पुणे : राज्यभरात झिकाच्या रूग्णसंख्येत (Zika Virus) झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आजार पसरताना दिसत आहेत. राज्यात झिका वायरसचे ८० रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वात जास्त ६६ रूग्ण हे पुणे शहरातील आहेत.
पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण!
पुण्यामध्ये झिका वायरसने डोकेदुखी वाढवली असून सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात झिकाचा संसर्ग आटाेक्यात आणण्यास आराेग्य यंत्रणेला अपयश आले आणि त्यामुळे पुणे शहरात आतापर्यंत सर्वाधिक ६६ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत एकूण ८० रुग्णांना झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
झिका वायरसचे लक्षणे काय?
लक्षणांमध्ये ताप, डोळे लाल होणे, सांधेदुखी, डोकेदुखी आणि मॅक्युलोपापुलर पुरळ यांचा समावेश असू शकतो. लक्षणे साधारणपणे सात दिवसांपेक्षा कमी असतात. सुरुवातीच्या संसर्गादरम्यान कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. गर्भधारणेदरम्यान संसर्गामुळे काही बाळांमध्ये मायक्रोसेफली आणि इतर मेंदूच्या विकृती होतात.
झिका कशामुळे होऊ शकतो?
झिकाचा संसर्ग हा विषाणूचा प्रसार म्हणजेच मुख्यतः संक्रमित एडिस प्रजातीच्या डासाच्या चाव्याव्दारे होतो. हे डास सहसा दिवसा सक्रिय असतात आणि डेंग्यू ताप, चिकुनगुनिया आणि पिवळा ताप देखील प्रसारित करू शकतात. या व्हायरसने अलीकडेच वैद्यकीय समुदायाची चिंता वाढवली आहे याचे मुख्य कारण म्हणजे गर्भधारणेमुळे उद्भवणारी गुंतागुंत. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर, झिका विषाणूच्या संसर्गामुळे मायक्रोसेफली होऊ शकते.
झिका होण्यापासून कसे रोखायचे?
झिका विषाणूपासून सर्वोत्तम संरक्षण म्हणजे, घरामध्ये आणि घराबाहेर डास चावण्यापासून रोखणे, विशेषत: सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जेव्हा डास सर्वाधिक सक्रिय असतात, अशा वेळेस डासांपासून वाचून राहा. उत्पादनाच्या लेबलवर दर्शविलेल्या सूचनांनुसार डासांपासून बचाव करा. लांब बाह्यांचा शर्ट आणि लांब पायघोळ घाला. तसेच, घराच्या परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्या व वातानुकूलित वातावरणात किंवा डास प्रवेश करू शकणार नाहीत अशा ठिकाणी राहा.