१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ मोहीम; विविध उपक्रम राबविण्यात येणार मुख्यमंत्र्यांची घोषणा!

मुंबई : राज्यात घरोघरी तिरंगा अभियान ९ ते १५ ऑगस्ट २०२४ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता राज्यस्तरीय शुभारंभ ऑगस्ट क्रांती मैदान येथून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती यावेळी असणार असून, हुतात्म्यांना अभिवादन करून आणि तिरंगा रॅलीने अभियानाची सुरुवात होणार असल्याचे समजते.

देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभर जय्यत तयारी सुरु झाली आहे. केंद्र शासनाने सन २०२२ पासून हर घर तिरंगा (घरोघऱी तिरंगा )अभियान सुरु केले. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष असून मागील दोन्ही वर्षी या अभियानात महाराष्ट्र राज्याने विविध उपक्रम राबविण्यात आघाडी घेतली. यावर्षीही तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याने देखील तयारी सुरू केली आहे.

१३ ते १५ ऑगस्टपर्यंत तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहन!

सर्व नागरिकांनी आपल्या घरांवर त्यासोबतच, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, संस्था, संघटना कार्यालय या सर्वांना या अभियानात सक्रिय सहभागी होत १३ ते १५ या कालावधीत तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री यांच्या सूचना काय?

दरम्यान, घरोघरी राष्ट्रध्वज उपलब्ध करुन द्यावा याकरिता जिल्हास्तरावर नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्या. राज्यातील प्रमुख धरणांसह मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, वरळी सी लिंक, गेटवे ऑफ इंडिया यासारख्या महत्वाच्या ठिकाणी तिरंग्याची रोषणाई करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत.