मुंबई : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच १९ ऑगस्टला देण्यात येणार होता; परंतु काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती तारीख बदलून आता लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या आधीच देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी, म्हणजेच १७ ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय!
राज्य मंत्रिमंडळाची काल महत्वाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यात राज्यातील महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदरच योजनेचा पहिला हप्ता देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
महिलांना मिळणार आर्थिक मदत!
लाडकी बहिण योजनेद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. महिलांना ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. आतापर्यंत राज्यातील लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत.
लाभार्थी महिला आनंदित!
लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच पहिला हप्ता मिळणार असल्याचे राज्य सरकारकडून जाहीर झाल्यानंतर महिला फार आनंदित आहेत. तसेच, हा एक चांगला निर्णय आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे.