नीरज चोप्रा पोहचला अंतिम फेरीत; पहिल्याच प्रयत्नात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारा ‘गोल्डन बॉय’ भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडली. या फेरीत भारताच्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करून थेट ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक दिली आहे.

नीरज चोप्रा याला ‘ब’ गटात ठेवण्यात आले होते. येथे त्याने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकून फायनलचे तिकिट मिळवले. या फायनलचे तिकिट मिळवण्यासाठी ८४ मिटर लांब भाला फेकणे, गरजेचे होते. दरम्यान, नीरजचा सर्वोत्तम थ्रो ८८.३६ मीटर होता, जो त्याने दोहा डायमंड लीग २०२४ मध्ये केला होता. म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पात्रता फेरीत ८९.३४ मीटर अंतर कापून त्याने या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

भालाफेक स्पर्धेत कोण कुठल्या स्थानावर?

नीरजने ८९.३४ मीटर अंतर कापून प्रथम स्थान मिळविले आणि ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.६३ मीटर अंतरावर भालाफेक केली असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर्मनीचा ज्युलियन वेबर तिसरा राहिला, त्याने ८७.७६ मीटर अंतर कापले. तसेच, पाकिस्तानचा अर्शद नदीम ८६.५९ मीटर अंतरासह चौथ्या स्थानावर राहिल्याचे समजते.

फायनल स्पर्धा कधी?

दरम्यान, ८ ऑगस्टला फायनल स्पर्धा असणार आहे. त्यानुसार, स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी किमान १२ खेळाडू पात्र ठरतात. पात्रता फेरीत एकूण ७ खेळाडूंनी ८४ मीटरचा टप्पा पार करून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या ७ खेळाडूनंतर सर्वोत्तम थ्रो करणाऱ्या ५ खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.