लाडकी बहिण योजनेचे पुण्यात सर्वाधिक अर्ज! ९ लाखांपेक्षाही जास्ती अर्ज सादर….

पुणे : महायुती सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ ला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. योजनेची नोंदणी सुरु झाल्यापासून अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाखांहून अधिक अर्ज सादर झाले असून, यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज दाखल झाले असल्याचे समजते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे.

पुणे जिल्ह्यात या योजनेला महिलांचा उत्तम प्रतिसाद!

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या पुणे जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ ला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. येथे एकूण ९ लाख ७२ हजार ८१९ महिलांनी अर्ज केले असल्याचे समजते. यात, हवेली तालुक्यातून सर्वाधिक ३ लाख ५४ हजार ९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. बारामती ६८ हजार ६२२, इंदापूर ६३ हजार ४८६, जुन्नर ५९ हजार ३१, शिरुर ५७ हजार २८७, खेड ५४ हजार ८०२, दौंड ५२ हजार ३४, मावळ ४६ हजार १३, आंबेगाव ३९ हजार ७५, पुरंदर ३७ हजार ९६७, भोर २९ हजार ४११, मुळशी २७ हजार ४३३ आणि वेल्हा ७ हजार ७४६ असे एकूण ९ लाख ७२ हजार ८१९ अर्ज सादर करण्यात आले आहेत.

‘नारीशक्ती’ या ॲपमुळे ऑनलाईन अर्ज!

नारीशक्ती दूत या ॲपमुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी झाली आहे. या ॲपमधून दररोज ७ ते ८ लाख अर्ज सादर होत आहेत. त्याशिवाय नारीशक्ती दूत या ॲप्लिकेशन्स ला ८८ लाख लोकांनी डाऊनलोड्स केले आहे. प्रत्येक मिनिटाला हे ॲप ८०० लोक डाऊनलोड्स करत असल्याचे समजते. त्यामुळे आता सगळ्यात जास्त डाउनलोड होणाऱ्या ॲपमध्ये नारीशक्ती दूत ॲप देशात २७ व्या क्रमांकावर आहे.

अर्जाच्या छाननी प्रक्रियेला सुरुवात!

१ लाख ८९ हजार ९०२ अर्ज पोर्टलवर भरण्यात आले असून इतर अर्जांवरील प्रक्रिया सुरू आहे. या छाननी प्रक्रियेत आतापर्यंत ७ लाख ६६ हजार ३९२ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तर ७९५ अर्ज नाकारण्यात आले आहेत. ६५ हजार २६५ अर्ज दुरुस्तीसाठी पुन्हा सादर करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. त्रुटी असलेल्या अर्जांबाबत संबंधित महिलांना भ्रमणध्वनी संदेशाद्वारे कळविण्यात येत आहे. त्याप्रमाणे त्रुटींची पूर्तता करून कागदपत्रे सादर करावे, तसेच उर्वरित पात्र महिलांनी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.