मुंबई : महाराष्ट्र सरकारने महिलावर्गाला खुश करण्यासाठी सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची घोषणा केली असून, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी राज्यातील महिलावर्गाला रक्षाबंधनाची भेट देण्याचे निश्चित केले. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये १५०० ते ३००० रुपये जमा केले जाईल असे आश्वासन केल्याने राज्यभरात महिलावर्गाची या योजनेकरिता अर्ज भरण्यासाठी आजही धावपळ सुरु आहे. अशातच योजनेचा लाभ घेण्याकरिता मराठीतून भरलेले अर्ज बाद होतील का? अशी शंका सर्वत्र निर्माण झाली होती; परंतु हे अर्ज बाद होणार नाही असे आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi tatkare) यांनी दिले आहे.
काय म्हणाल्या अदिती तटकरे?
अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता मात्र बँकेने आता या तांत्रिक अडचणींना सोडवले असून आता मराठीमध्येही केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत. तसेच, मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे पण अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये, आणि मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
वर्षाला ३ गॅस सिलेंडर देखील मोफत!
काही गरीब कुटुंबातील महिलांना बाजार दराने गॅस गॅस खरेदी करणे परवडत नाही. तसेच, त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहचवतात. त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आलेली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे.