मुंबई : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार (IMD) महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाचा जोर आणखीच वाढणार आहे. त्यामुळे आज पुणे साताऱ्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे.
मुंबई शहराच्या तुलनेत पूर्व व पश्चिम उपनगरात शनिवारी सकाळी आणि दुपारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना अक्षरश: झोडपून काढले असून, रविवारीही या पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये पालघर, पुणे आणि सातारा जिल्हयांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
५ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता!
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत महाराष्ट्रात काही ठिकाणी कडक ऊन देखील पडणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र जिथे कडक ऊन पडणार त्या ठिकाणी चांगला पाऊसही पडणार असेदेखील सांगण्यात आले.
विदर्भातही पावसाचा जोर वाढणार!
माहितीनुसार, राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागात चांगला पाऊस पडणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अचलपूर, वाशिम, अकोला, अकोट, बुलढाणा, जालना, सिंदखेड राजा, सिल्लोड, वैजापूर, जळगाव, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, इगतपुरी, छत्रपती संभाजीनगर या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.