नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर दर पावसाळ्यात पदोपदी निर्माण होणारे खड्ड्यांचे साम्राज्य, कसारा घाटातील खचणारा रस्ता आणि वडपे आणि ठाणे दरम्यान नेहमीच होणारी प्रचंड वाहतूक कोंडी या सर्व प्रकरणांमुळे लोकांना फार मनस्ताप सहन करावा लागतो, म्हणूनच आता या महामार्गावरील टोल नाका बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशाराच राज्य सरकारकडून देण्यात आलेला आहे. यासोबतच,महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल, असा कडक इशाराही देण्यात आलेला आहे.
मुंबई-नाशिक महामार्ग हा उत्तर महाराष्ट्राला मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून इथे वर्षभर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नाशिक-मुंबई प्रवासाचा वेळ ८ ते १० तासांवर पोहोचला आहे. दरम्यान, काल याच महामार्गावरील खड्ड्यांच्या संदर्भात नाशिक शहरातील उद्योजक आणि पालकमंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांच्यात संयुक्त बैठक पार पडली.
दादा भुसे नेमके काय म्हणाले?
या महामार्गावरील प्रवासाला फार जास्ती वेळ लागतोय हे खरे आहे. मात्र आता भिवंडीला आपण बारा लेनचा रस्ता करतोय. सध्या या भागातील महामार्गावरील ४४ कट आम्ही ३-४ वर आणले आहेत. JNPT वरील माल भिवंडीतील मोठ्या गोडाऊन मध्ये जातात. त्यामुळे वाहतुकीवर फार परिणाम होतोय. भिवंडीतील २० किलोमीटर महामार्ग १२ लेन करतोय. जड वाहनांना महामार्गावर रात्री आणि दिवसा वेळ ठरवून दिली जाईल. लहान वाहनांना महामार्गावरील १-२ लेन राखून ठेवणार, असे ते म्हणाले. याआधि देखील, दादा भुसे म्हणाले होते की, या महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होणे म्हणजे ही, वस्तूस्थिती आहे. पुलांची कामे आणि खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी होत असून मुख्यमंत्र्यांकडून या वाहतूक कोंडीची दखल देखील घेण्यात आलेली आहे. संबंधित यंत्रणेला खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे देखील दादा भुसे म्हणाले होते.