नाशिक : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी अधिवेशनात महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली होती. गरीब महिला आणि मुली स्वावलंबी व्हावे यासाठी सरकार त्यांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत करेल. याच संदर्भात आता अजित पवार यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या पाच लाभार्थी महिलांसाठी प्रमाणपत्राचे वाटप केले आहे. त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाभार्थी महिलांना गिफ्ट मिळाले असल्याचे समजते.
अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार (Nitin pawar) यांच्या मतदार संघात कळवण-सुरगाणा येथे तब्बल ७३६ कोटी रुपयांच्या विकास कामांचे तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी तेथे प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार उपस्थित असून त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीतील पाच लाभार्थी बहिणीला रक्षाबंधनाचे गिफ्ट दिले आहे. या योजनेअंतर्गत औपचारिकरीत्या पाच महिलांचा सन्मान करत त्यांनी हे प्रमाणपत्र दिले असल्याचे समजते.
योजणेबाबत सूचना देताना अजित पवार काय म्हणाले?
आमदार नितीन पवार यांचे संपूर्णपणे या योजनेकडे लक्ष आहे. तसेच, मी नक्कीच रक्षाबंधनापूर्वी १ कोटी महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ देणार आणि यासोबतच वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय देखील महायुतीच्या सरकारने घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर या योजनेद्वारा आपल्यावर झालेल्या टीकेवर भाष्य करत ते म्हणाले, मी दहावा अर्थसंकल्प सादर केला असून, माझ्यावर दोन दिवस सतत टीका करण्यात आली. अर्थ संकल्प मांडताना निधी नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या देऊन लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा हा चुनावी जमला आहे, अशी टीका माझ्यावर करण्यात आली; परंतु ऑगस्ट महिन्यात दोन महिन्याचे पैसे महिलांना कसे मिळतील आणि गरीब वर्गाला कशी मदत करता येईल, याबद्दलच मी प्रयत्न केलेला आहे. यासोबतच, लाडकी बहीण योजनेवर मी कधीही आक्षेप घेतला नव्हता, असे स्पष्टीकरणही अजित पवार यांनी यावेळी दिले.