पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या मुलाने मिळवले कांस्य पदक; मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन…

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक यश आले आहे. कोल्हापूरचा स्वप्निल कुसाळे याला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळाले असून ५० मीटर एअर रायफल तिसऱ्या पोझिशनमध्ये स्वप्निलने हे कांस्य पदक मिळवले असल्याचे समजते. भारताला मिळालेले हे तिसरे पदक आहे. अशातच आता या महाराष्ट्राच्या मुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अभिनंदनही केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे.  स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले. स्वप्नीलने ७२ वर्षांनी महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन, तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केलाय. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील नेमबाजीची परंपरा स्वप्नीलने कायम राखली. तसेच, कांबळवाडीसारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकवले. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढविला असून स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले.
स्वप्नीलची ऐतिहासिक कामगिरी
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympic 2024) मध्ये नेमबाज स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावले असून या स्पर्धेत स्वप्नीलने एकूण ४५१.४ गुण मिळवले आहेत. १९५२ साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खासाबा जाधव यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. आता असाच ऐतिहासिक पराक्रम करून स्वप्नील दुसरा मराठमोळा खेळाडू ठरला आहे.