चक्क सहा तास घरात बिबट्याचा थरार ; शेळीलाही केले ठार

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सावंगी या गावामध्ये बिबट्याने चक्क सहा तास एका घरामध्ये ठिय्या मांडला, यावेळी बिबट्याने शेळींवर हल्ला केला असून यात एका शेळीचाही बळी गेला. ही घटना पहाटे ३:३० च्या सुमारास घडली. सचिन रतिराम रंदे ( sachine ratiram rande) यांच्या घराचे कवेलू तोडून बिबट्याने धूम ठोकली व गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शेळींवर झालेल्या हल्ल्यानंतर बिबट्याने तेथून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, मात्र सचिनचे वडील तेथेच झोपून असल्याने त्यांना घाबरून हा बिबट्या घराच्या आड्यावर जाऊन लपला. या बिबट्याच्या घाबरीने सर्वत्र खळबळ माजली आणि तत्काळ गावकऱ्यांनी याबाबतची संपूर्ण माहिती वन विभागाला व स्टाब टीमला दिली, माहिती मिळताच तळोधी (बाळापुर) चे वनपरिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार यांच्या मार्गदर्शनात बचाव पथकातील सदस्य व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सर्वात आधी त्यांनी छताजवळील खिडकीला जाळे लावून दरवाजाला पिंजरा लावला आणि त्यानंतर त्या बिबट्याला पिंजऱ्यात हाकलण्याचा प्रयत्न केला. पाऊस सुरू असतानाही वन विभाग कर्मचाऱ्यांचे बिबट्याला जाळ्यात अडकवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते; परंतु पुरामुळे रस्ते बंद असल्यामुळे बिबट्याला बेशुद्ध करण्याकरिता वन विभागाला कोणालाही पाचारण करता आले नाही. काही कर्मचाऱ्यांनी तर कवेलुवर चढून बिबट्याला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. सर्व प्रयत्न झाल्यानंतर शेवटी बिबट्यानेच कवेलू तोडून घरावर चढून घराच्या मागच्या बाजूने  जंगलाच्या दिशेने धाव घेतली मात्र त्यानंतर गावकऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
माहितीनुसार १९ जुलैला देखील चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातील मोहाळी येथे बिबट्यांनी धुमाकूळ घालून चक्क ६ जणांना जखमी केले होते, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गावांमध्ये बिबट्यांचा थरार जास्ती प्रमाणात वाढत असल्याचे समजते.