ठाण्यातील नगमाचे पाकिस्तानी तरुणाशी लग्न ; नेमके प्रकरण काय?

ठाणे : सीमा हैदर प्रकरणानंतर पुन्हा एकदा ठाण्यातील नगमाने पाकिस्तानी जावई आणल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुक वर झालेल्या ओळखीनंतर नगमा नुर मकसूद अली (२३वर्ष) या तरुणीने पाकिस्तान प्रवास करीत पाकिस्तानातील अबोटाबाद येथे जाऊन सनम खान या तरुणाशी लग्न करून ठाण्यात परत आल्याचा संशय गुप्तचर यंत्रणा व ठाण्यातील पोलिसांना आहे.

सोशल मीडियावर ओळखी झालेल्या पाकिस्तानी तरुणाशी नगमाने गुपचूप लग्न उरकवल्याचे म्हटले जात आहे. नगमा काही महिने तिच्या या मित्रासोबत राहिली आणि १७ जुलैला ती भारतात परतली. यासोबतच तिने बनावट कागदपत्रे तयार केले व नावातही बदल केले. यामध्ये तिने आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच तिच्या मुलीचा बनावट जन्म दाखला एका दुकानातील व्यक्तीकडून तयार करून घेतले. ते कागदपत्रे खरे असल्याचे दाखवून तिने पासपोर्ट देखील बनवून घेतला आणि म्हणूनच बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनवल्या प्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. तिच्या लग्नाबाबत आणि त्या तरुणासोबत राहण्याबाबतची सर्वत्र माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून ठाणे पोलिसांना मिळाली आहे, त्यामुळे आता वर्तकनगर पोलिसांनी नगमाची चौकशी करणे सुरू केले आहे.

याआधीही, असेच काही प्रकरण घडले होते. अंजू नावाच्या तरुणीनेही पाकिस्तानात जाऊन तिथल्या तरुणाशी लग्न केले होते. त्यावेळी पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणेने आयएसआयने त्या दोघांचे फोटोशूट करून सोशल मीडियावर व्हायरलही केले होते.