नागपूर शहरात अतिवृष्टीमुळे दोघांचा मृत्यू एक बेपत्ता

नागपूर (Nagpur) शहरात शनिवारी २० जुलै २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या घटनेत तीन व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या असून यातील दोघांचे मृतदेह सापडले आहेत. भरतवाडा, पूनापूर व सोमलवाडा येथील तलाठयांच्या आज दाखल प्राथमिक चौकशी अहवालातील माहिती नागपूरचे (शहर) तहसिलदार संतोष खांडरे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांना सादर केली आहे. अतिवृष्टीमुळे तीन व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहत गेल्याचे या अहवालात आढळून आले आहे.

श्यामनगर पुनापूर भागातील भोजराज बुलीचंद पटले (५२) हे नाल्याच्या बाजूने उभे असतांना अचानक त्यांचा पाय घसरुन पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेले. त्यांचा मृतदेह सापडला असून मेयो हॉस्पीटल येथे पाठविण्यात आला आहे. भरतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनबाबा नगर परिसरात श्रावण विजय तुलसिकर (१२) हा नाल्याच्या बाजूने खेळत असतांना पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेला. या मुलाचा मृतदेह अजूनपर्यंत सापडलेला नाही. अन्य एका दुर्घटनेत बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत नरेंद्र नगर भागातील श्रीहरी सोसायटी मधील सुधा विश्वेश्वरराव वेरुळकर (८५) या मानसिक रुग्ण महिला बेलतरोडी ते बेसा लगतच्या नाल्याचा पूर पाहण्याकरिता गेल्या असता पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्या. रविवार (२१ जुलै) सकाळी श्यामनगर परिसरातील नाल्यातून त्यांचा मृतदेह काढण्यात आला.