कचारी सावंगा गावाच्या पुनर्वसनाला गती! जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली महत्त्वाची बैठक

काटोल तालुक्यातील जाम नदी तिरावर असलेल्या कचारी सावंगा गावच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न ऐरणीवर आला आहे. जाम नदीचा मागच्या 10 वर्षातील महत्तम पूर पातळी अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी अधिकाऱ्यांसमवेत महत्वाची बैठक पार पडली. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.

काटोल तालुक्यातील कचारी सावंगा या गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागच्या 30 वर्षापासून प्रलंबित आहे. जाम नदी तिरावर असलेल्या या गावात जाम नदी प्रकल्पातील पाण्याची थोप दरवर्षी येते. त्यामुळे सरपटणारे प्राणी, भिंतीला ओल येणे, मातीची घरे पडणे, पुलावरून पाणी वाहणे, पुलाला भगदाड पडणे, साथीचे आजार आणि गावाच्या चहुबाजूने पाणी साचत असल्याने गावकरी त्रस्त आहे. जाम नदी प्रकल्प संघर्ष समितीने कचारी सावंगा गावाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहे. जाम नदी प्रकल्प संघर्ष समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवत गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत गुगल नकाशाच्या माध्यमातून गावाची आणि नदीची पाहणी करण्यात आली. तसेच जाम प्रकल्पाची माहिती घेऊन पुनर्वसनासाठीच्या जागेची चर्चा केली. डॉ. इटनकर यांनी कचारी सावंगा गावचे पुनर्वसन करण्यास सकारात्मकता दर्शवत जाम नदीचा मागील 10 वर्षातील महत्तम पूर पातळीचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सहाय्याने तात्काळ सादर करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला दिले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री सुबोध मोहिते, काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे, कचारी सावंगा गावचे सरपंच रवी जयस्वाल, जाम नदी प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश दुबे, अॅड. प्रवीण मेहर, ग्रामपंचाय सदस्य देवराव मानकर, गोपाल डिवरे, शरद भिंगारे, गौरव मानकर यांच्यासह काटोल तालक्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

पुनर्वसन का हवे –
1. जाम नदी प्रकल्पातील पाण्याची थोप गावापर्यंत येतात.
2. मातीच्या भिंतींना ओलावा असून त्या घरांना धोका निर्माण झाला आहे.
3. जाम नदीच्या पुरामुळे गावाला चोहोबाजूने वेढल्या जाते. त्यामुळे गावाचा संपर्क तुटतो.
4. डिवरे नाल्यावरील पुलाला मोठे भगदाड पडते. त्यामुळे दरवर्षी डागडुजी करावी लागते.
5. सर्पदंशामुळे दरवर्षी मृत्यू होते.
6. प्रकल्पातील पाणी गावापर्यंत येत असल्याने अनेक डास तयार होऊन साथीचे आजार होतात.