नागपूर : गेले तीन दशकांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत समाज प्रबोधनाचे कार्य करणारे ज्येष्ठ संपादक – पत्रकार श्री श्रीराम पवार यांना यंदाचा डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सी. मो. झाडे फाउंडेशनतर्फे नागपुरात चालविण्यात येणाऱ्या डॉ. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून २०१३ पासून देशात सर्वोत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व सामाजिक संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. १ लक्ष रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २० जुलै २०२४ रोजी नागपूर येथे त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.
कोण आहेत श्रीराम पवार –
श्रीराम पवार हे लेखक, स्तंभलेखक, राजकीय विश्लेषक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. सकाळ या वृत्तपत्रात त्यांनी मुख्य संपादक म्हणून काम सांभाळले आहे. ते पुण्याच्या गोपाळकृष्ण गोखले अकादमीचे संचालक आहेत. तर कोल्हापूर विद्यापीठात राज्यशास्त्राचे मानद प्राध्यापक आहेत. तसेच जगाच्या अंगणात : वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा, धुमाळी : करंट अंडरकरंट, मोदीपर्व, राजपाठ : वेध राष्ट्रीय राजकारणाचा यांसारख्या पुस्तकांचे लेखन श्रीराम पवार यांनी केले आहे.
पुरस्काराचे मानकरी –
डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराची सुरुवात २०१३ मध्ये करण्यात आली. दिल्लीचे ज्येष्ठ गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव, पुण्याचे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, दिल्लीचे कर्मयोगी रवी कालरा, धारणी मेळघाटचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवी कोल्हे आणि स्मिता कोल्हे, गुवाहाटीच्या अर्थतज्ज्ञ डॉ. अलका सरमा, सरहदचे संस्थापक संजय नहार, गडचिरोलीतील कुरखेडा येथे आदिवासींसाठी काम करणारे डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख, आदिवासी बहुल असलेल्या किनवट येथे आदिवासींच्या आरोग्याची सुश्रूषा करणारे डॉ. अशोक बेलखोडे, जोधपूरचे ऑस्टियोपॅथ डॉ. गोवर्धनलाल पाराशर, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.