विदर्भातील अनेक नवख्या कलाकारांनी एकत्र येत ‘ऑक्टोपस’ अंधश्रध्देच्या हजार पायांचा’ हा लघुचित्रपट साकारला. नुकतच ऑक्टोपस या लघु चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालं असून आता हा चित्रपट येत्या 22 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आणि स्थानिक कलाकारांमध्ये उत्साह संचारला आहे.
अमरावती जिल्ह्याच्या वरूड तालुक्यातील शेंदुरजनाघाट शहरात ऑक्टोपस लघु चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आलं. समाजातील अंधश्रध्देने गुरफटलेल्या कुप्रथांनी माणसाचं आयुष्य कसं उध्वस्त होतं याचं यथातथा चित्रिकरण या कलाकरांनी साकारलं आहे. त्याचबरोबर चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल पाटील यांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. यात अॅक्शन, हॉरर सिन, सस्पेन्स आणि अस्सल वैदर्भीय भाषेतील संवाद प्रेक्षकांचं मन मोहून घेते.
राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त
राष्ट्रीय स्तरीय चित्रपट स्पर्धेत या लघु चित्रपटाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात बेस्ट थ्रीलर फिल्म, बेस्ट निगेटिव्ह रोल मेल, बेस्ट डायरेक्टर अश्या अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
चित्रपटाचं पोस्टर लॉन्च
ऑक्टोपस लघु चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, चित्रपटाचं पोस्टरही नुकतंच प्रदर्शित केलंय. याप्रसंगी वरूड पोलीस स्टेशनचे पो.नि. अवतारसिंग चव्हाण, स.पो.नि. लक्ष्मण चिंचोले, स.पो.नि. दिपक महाडिक, बन्सी पानजंजाळ व शेंदुर्जनाघाट पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सतीश इंगळे व इतर पोलीस कर्मचारी आणि बिरसा क्रांति दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा. कमलनारायाण उईके व ॲड. योगेश नागले आणि इतर मित्रमंडळी यांच्या हस्ते ऑक्टोपस लघु चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी ऑक्टोपस लघुचित्रपटाच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल पाटील यांनी हा चित्रपट येत्या 22 जून ला व्ही.डी.ओ. जार या ओटिटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर अनेकांनी हा चित्रपट पाहावा असे आवाहन सुद्धा केले.