खा.रक्षाताई यांना पीएमओमधून निरोप अन् अश्रू अनावर

जळगाव :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शपथ घेत असतांना पहिल्याच यादीत खा.रक्षाताई खडसे यांना सुद्धा केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. आपल्याला मंत्री पदाची शपथ घ्यायची असल्याचा प्रधानमंत्री कार्यालयातून फोन आल्यावर खा.रक्षाताई यांना आनंदाश्रू अनावर झाले.त्यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांचे विशेषतः गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे मंत्रीपदावर नाव निश्चित केले म्हणून आभार मानले. एकनाथराव खडसे आणि मतदारसंघातील सर्वांनी घेतलेल्या मेहनतीला फळ मिळाल्याच्या भावना व्यक्त करत सामान्य कार्यकर्त्यांना मंत्रीपदाची ही उपलब्धी समर्पित असल्याचे बोलून दाखवले.

केंद्रात आता मोदी सरकारचे 3.0 पर्व सुरु होत असून आज सायंकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पुन्हा भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेत आहेत.मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात रावेर लोकसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विजयी पताका फडकवणाऱ्या खा. रक्षाताई खडसे या सुद्धा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. खा.रक्षाताई यांची पहिल्याच यादीत मंत्रीपदी वर्णी लागल्याने जिल्ह्यासह खान्देशात आनंदाला उधाण आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांपैकी केवळ दोन जागांवर भाजपला विजय मिळाला होता. त्यात उत्तर महाराष्ट्रात दोन्ही विजयी जागा या जळगाव जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे यातील खा.रक्षाताई खडसे यांनी सलग तिसऱ्यांना विजयी होत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले आहे.

एम.के.अण्णा यांच्यानंतर जिल्ह्याला मिळाला मान

भारताच्या 14 व्या लोकसभेत एरंडोल लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेले एम. के. अण्णा पाटील हे तत्कालीन पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2004 ते 2007 याकाळात ग्रामीण विकास राज्यमंत्री होते.त्यानंतर मात्र जिल्ह्यातील कोण्याही खासदाराला केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळाली नाही.मोदी यांच्या 2014 व 2019 या दोन्ही कार्यकाळात उत्तर महाराष्ट्राला एक राज्यमंत्रिपद मिळाले होते. 2014 मध्ये धुळ्याचे तत्कालीन खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संरक्षण राज्यमंत्रिपद मिळाले होते, तर 2019 च्या कार्यकाळात दिंडोरीच्या डॉ. भारती पवार यांना आरोग्य राज्यमंत्रिपद मिळाले होते. यंदाच्या निवडणुकीत हीना गावित,डॉ. सुभाष भामरे, भारती पवार यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासारख्या आठ खासदारांच्या पट्ट्यात एक केंद्रीय मंत्रिपद वाट्याला येण्याची शक्यता होती. रक्षाताई खडसे या सलग तिसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत. त्यात राज्यात दुसऱ्या क्रमाकांचे मताधिक्य मिळाल्याने त्यांना मंत्रिपद चालून आले आहे. जळगाव जिल्ह्यातून पहिल्या महिला केंद्रीय मंत्री होण्याचा मान खा. रक्षाताई यांना राहील, हे विशेष.