धुळे :- स्वतःच्या तीन वर्षीय मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके घालून तिच्या खून करून मृतदेह पुरणार्या नराधम बापाला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. पूजा अनिल पावरा असं त्या मृत मुलीचं नाव असून अनिल गुलाब पावरा असं आरोपी बापाचं नाव आहे.
खुनाची घटना 6 जूनला शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावात घडली आहे. पूजा ही आरोपी अनिल गुलाब पावरा याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झाला आहे. तिला अनिल पावरा सांभाळत होता. दरम्यान अनिल पावरा याने दुसरे लग्न केले. मात्र त्याची दुसरी बायकोही निघून गेली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जूनला रात्री दारूच्या नशेत असलेल्या अनिल पावरा याने मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिचा खून केला. 6 जूनला सकाळी तिचा मृतदेह स्वतःच्या राहत्या घरामागे जमिनीत खड्डा करून पुरला.
त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याचे नातेवाईक राहतात. दोन दिवस पूजा पावरा दिसत नसल्यामुळे त्यांनी चौकशी केली असता अनिल पावरा याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांनी पोलिस पाटील पंकज पावरा यांच्या कानावर ही माहिती घातली. त्यानंतर पोलिस पाटलांनी अनिल पावराची कसून चौकशी केली. त्यावर अनिल पावरा याने आपण मुलीचा खून केला असल्याची कबुली दिली.
पोलिस पाटील पंकज पावरा यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी जयपाल हिरे आणि सहकारी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शव विच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली.