तेलंगणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती; तब्बल ३१ जणांचा मृत्यू!

City Police Commissioner IPS SV Rajasekhara Babu with others reviews the rescue operation at a flood-affected area after heavy rainfall, in Vijayawada. File Photo/ PTI.

हैदराबाद : मुसळधार पावसामुळे आंध्र आणि तेलंगणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. दोन्ही राज्यांमध्ये पूर आणि पावसामुळे आतापर्यंत सुमारे ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. काही भागात १० फुटांपर्यंत पाणी आहे. शहरातील २.७६ लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने आणि ट्रॅक खराब झाल्यामुळे ४३२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर १३९ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच, मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते.

पावसामुळे दीड लाख एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले!

एनडीआरएफ (NDRF) लष्कर आणि इतर यंत्रणा मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे तेलंगणात १६ आणि आंध्र प्रदेशात १५ जणांचा मृत्यू झाला. दीड लाखांहून अधिक एकरातील पिकांचे नुकसान झाले. राज्य सरकारने सुमारे ५,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त केला आहे आणि केंद्राकडून २,००० कोटी रुपयांची तात्काळ मदत मागितली आहे. तसेच पूर ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी केली. आंध्र प्रदेशातही सुमारे साडेचार लाख लोकांना पुराचा फटका बसला असल्याचे समजते.

SDRF आणि NDRF च्या टीम बचाव कार्यात गुंतल्या!

एसडीआरएफ (SDRF) च्या २० टीम आणि एनडीआरएफच्या (NDRF) च्या १९ टीम्स मदत आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. एनडीआरएफच्या नऊ टीम आणि एसडीआरएफच्या आणखी दोन टीम सर्वाधिक बाधित विजयवाड्याकडे रवाना झाल्या आहेत. गुंटूर आणि एनटीआरच्या प्रभावित भागात शोध आणि बचाव कार्यासाठी हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.

२४ तासांत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता!

हवामान खात्याने येत्या २४ तासांत आदिलाबाद, जगत्याल, कामारेड्डी, कोमाराम भीम आसिफाबाद, मेडक, मेडचल मलकाजगिरी, निजामाबाद, पेड्डापल्ली, संगारेड्डीसह ११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे, आंध्र प्रदेशात गेल्या तीन दिवसांत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे साडेचार लाख लोक बाधित झाले आहेत. ३१,२३८ लोकांना १६६ मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. एनटीआर, गुंटूर, कृष्णा, एलुरु, पालनाडू, बापटला आणि प्रकाशम या जिल्ह्यांचा सर्वाधिक फटका बसला आहे.