मुंबई : राज्य सरकराने जून महिन्यात राज्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आणि ३१ ऑगस्ट पर्यंत सर्व राज्यातील बहिणींना अर्ज करण्याची संधी होती. मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी (२ सप्टेंबर) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला असल्याचे समजते.
दरम्यान, सरकारच्या या योजनेला राज्यभरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असून, आता योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांना मिळावा यासाठी अर्ज भरण्यास ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
लाडकी बहिण योजनेचे अर्ज प्रक्रिया सुरूच!
अजूनही राज्यातील अनेक महिला या योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत. काही भागात महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेकवेळा प्रयत्न करूनही अनेक महिलांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. याच सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एका महिन्याने वाढवल्याचे सांगण्यात येत आहे.
तीन महिन्यांचे ४५०० रुपये देण्यात येईल!
आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३ हजार रुपये म्हणजेच योजनेचे दोन हप्ते जमा केले आहेत. मात्र जुलै महिन्यात भरलेल्या काही महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, तर काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यामुळे त्यांच्या अर्जांची पडताळणी आणि छाननी करणे बाकी आहे. ही छाननी ३१ ऑगस्टपर्यंत सुरू होती. त्यामुळे आता ज्या महिलांच्या अर्जांची छाननी झाली आहे, अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा एकूण तीन महिन्यांचे ४५०० रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. मात्र सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळेल मिळणार आहे.