सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात जोरदार पावसाने आगमन केले आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत, तर विदर्भात काही जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे नद्या, नाल्यांना पुर आला आहे. पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली आहे. तर शेती देखील पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, अनेक गावांचा संपर्क तुटला असून, शेकडो घरात पाणीही शिरले, विदर्भ व मराठवाड्याला जोडणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. रस्ता बंद झाल्याने मराठवाडा व विदर्भाचा संपर्क तुटला आहे. तसेच, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वाशिम जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान!
वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. परभणीत पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्यासाठी गेल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून येथील शेलूबाजार परिसरातील कारंजा रोड येथील सेंट्रल बँक, स्टेट बँक एटीएम व येथील ग्रामपंचायतच्या गाळ्यांमध्येही पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे येथे असणाऱ्या दुकानांमधील साहित्याचे नुकसान झाले.
नांदेडमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस!
नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. किनवट तालुक्यात १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर सिंदगी, उमरी बाजार व किनवट या मंडळात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. किनवटसोबतच हिमायतनगर, माहूर, हदगाव, भोकर, अर्धापूर, मुदखेड, या तालुक्यांत पुरस्थिती निर्माण झाली आहे.
हिंगोलीत काही ठिकाणी पूरस्थिती!
हिंगोली जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीला फटका बसला असून येथील सावरखेडा गावामध्ये काही ठिकाणी पूर आला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बचावले आहे. जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण ९५ टक्के भरल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
बीडमध्ये पूल वाहून गेला!
बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे परळी-बीड मार्गावरील पापनाशिणी नदीवर पूल वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. येथील शिवाय वाण-वाप नदीच्या पुलावर देखील पाणी साचले आहे. पावसामुळे परळीहून बीड कडे जाणारी वाहतूक नागापूरहून शिरसाळाच्या दिशेने वळवली गेली आहे.
अकोल्यात ९६.६ टक्के धरण भरले!
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरण पूर्ण भरले आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. धरण हे ९६.६ टक्के भरले. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आज मुसळधार पावसाचा इशारा!
हवामान विभागाने (IMD) पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश सह देशातील १८ राज्यात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.