यूपीआय (UPI) या डिजीटल पेमेंट सुविधेनंतर आता भारतीय रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) युएलआय ही सुविधा आणत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस आयडेंटिटीच्या माध्यमातून भारतातील डिजीटल व्यवहारांमध्ये क्रांती घडून आली आहे. अशातच आता युएलआय (युनिफाइट लेंडीग इंटरफेस) या सुविधेद्वारे आरबीआय डिजीटल क्रेडीटच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रात नाविन्यपुर्ण बदल करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, या बदलाला आरबीआयने युनिफाइट लेंडीग इंटरफेस (युएलआय) असे नाव दिले आहे. तसेच, लहान रकमेचे कर्ज घेणारे आणि ग्रामीण भागातील ऋणको यांच्यासाठी मुख्यतः यूएलआय ही योजना आणली जाणार असल्याचे समजते.
‘यूएलआय’ सुविधा नेमकी कशी असणार?
भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास ( Shaktikant das) यांनी बंगळुरू येथील डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर एंड इमर्जिंग टेक्नोलॉजीज संबंधित कार्यक्रमात याबाबत माहिती दिली की, आरबीआय सध्या फ्रिक्शनलेस क्रेडिटसाठी युएलआय चे तंत्रज्ञान प्लॅटफार्मचा पायलट प्रोजेक्ट चालवत आहे. ज्यामध्ये बॅंक ग्राहकांचे कर्ज मंजुर करण्यासाठी सिस्टिमला सुव्यवस्थित केले जाणार आहे. ज्यामुळे देशभरातील नागरिकांना कमी वेळेत कर्ज घेणे शक्य होणार असून अल्प प्रमाणात कर्ज घेणाऱ्यांना या प्रणालीचा मोठा फायदा होणार आहे.
‘यूएलआय’ लवकरच देशभर राबवली जाईल!
पायलट प्रोजेक्टच्या निष्कर्षानंतर युएलआय लवकरच देशभरात सुरू होणार. ज्याप्रमाणे संपूर्ण डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये मोठा बदल घडवून आणण्यात युपीआय पेमेंट प्रणाली यशस्वी ठरली आहे. त्याचप्रमाणे यूएलआय ही देखील सुविधा भारतातील कर्ज देण्याच्या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार. दरम्यान, देशातील जेएएम, युपीआय, युएलआय हे त्रिकूट भारताच्या डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणार असल्याचेही शक्तीकांत दास यांनी सांगितले.
फक्त पिन टाकून मिळणार कर्ज!
कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा आधार, ई-केवायसी, जमिनीच्या नोंदी, पॅन प्रमाणीकरण आणि अकाउंट एग्रीगेटरसह विविध स्त्रोतांकडून ULI अॅप डेटा संकलित करेल. ज्याप्रमाणे तुम्ही फक्त तुमचा पिन टाकून UPI मध्ये पेमेंट करता, त्याच प्रकारे तुम्ही पात्र असल्यास, तुमचा पिन टाकून तुम्ही कर्ज घेऊ शकता.