सिंधुदुर्गमध्ये २८ फूट उंच शिवरायांचा पुतळा कोसळला; बांधकामावरून अनेक शिवप्रेमी संतप्त!

सिंधुदुर्ग : मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज (सोमवार) दुपारी हा पुतळा कोसळला. शिवरायांचा पुतळा कोसळल्याने या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. अचानक पुतळा कसा काय कोसळला याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे २०२३ च्या डिसेंबर मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मालवण मध्ये येऊन या पुतळ्याचे अनावरण केले होते. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच होता. जमिनी पासून बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता. सध्या या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली असून राजकीय नेत्यांकडून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक काय म्हणाले?

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. खरे तर ज्यावेळी हा पुतळा तयार करण्यात येत होता त्यावेळीच स्थानिक लोकांनी कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या मात्र जे विरोध करत आहेत ते आपल्या विरोधात आहेत असे समजून याकडे दुर्लक्ष केले गेले. ४०० वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील काम ढासळले. आता या प्रकरणी दोषींवर गुन्हे झालेच पाहिजे अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करु, असा इशाराही यावेळी वैभव नाईक यांनी दिला.

शिवरायांचा पुतळा उभा करणे हे आमचे कर्तव्य!

सरकारमधील शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवरायांचा पुतळा कोसळला ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. तिथले पालकमंत्री सर्व प्रकरणाची चौकशी करतील, परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे शिवरायांचा पुतळा लवकर उभा करणे हे आमचे पहिले कर्तव्य असेल, असे केसरकर म्हणाले आहेत.